अहिल्यानगर हादरले..! जलजीवन घोटाळ्यात अखेर मोठा धमाका;जिल्हापरिषदेचे ६ अधिकारी तडकाफडकी निलंबित!राज्यातील पहिलीच सर्वात मोठी कारवाई
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील ‘जलजीवन मिशन’ योजनेला अहिल्यानगर जिल्ह्यात भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे अखेर उघड झाले आहे. कोट्यवधी रुपये खर्च करूनही जनतेला पाण्याचा एक थेंबही न मिळाल्याने संताप व्यक्त होत असतानाच,आतापर्यंतची सर्वात मोठी आणि खळबळजनक कारवाई करण्यात आली आहे.जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील कार्यकारी अभियंत्यासह तब्बल ६ बड्या अधिकाऱ्यांना तडकाफडकी निलंबित करण्यात आले आहे.या महाकारवाईमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यात आणि राज्यातील प्रशासकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे.विशेष म्हणजे,जलजीवन मिशन घोटाळ्याप्रकरणी राज्यातील ही पहिलीच एवढी मोठी आणि कठोर कारवाई मानली जात आहे.शासनाकडून जलजीवन योजनेसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पाणीसारखा वाहिला,मात्र प्रत्यक्षात ग्रामीण भागातील नागरिकांचे घसे कोरडेच राहिले.निकृष्ट दर्जाची कामे आणि मोठ्या प्रमाणावर झालेली आर्थिक अनियमितता पाहून अखिल भारतीय मराठा महासंघाचे प्रदेशाध्यक्ष संभाजी दहातोंडे पाटील यांनी या गंभीर प्रकरणाची वरिष्ठ पातळीवर तक्रार केली होती.त्यांच्या या तक्रारीची दखल घेत चौकशीचे आदेश देण्यात आले आणि पहिल्याच टप्प्यात भ्रष्टाचाराचे भयानक वास्तव समोर आले.
जिल्हापरिषदेकडे जलजीवनच्या तब्बल ८३० योजना आहेत.यापैकी सात सदस्यीय समितीने १० तालुक्यांतील ५३३ योजनांपैकी १६ योजनांची खर्चाच्या बाजूने आणि १५ योजनांची गुणवत्तेच्या दृष्टीने तपासणी केली.या तपासणीत गंभीर त्रुटी, निकृष्ट कामे आणि आर्थिक व्यवहारात मोठी तफावत आढळली.त्यानंतर निपक्ष चौकशी व्हावी यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सचिव रंगा नायक यांनी खालील ६ अधिकाऱ्यांना निलंबित केले आहे.
१. एच. बी. चव्हाण (कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग)
२. एस. एस. गडधे (तत्कालीन प्रभारी कार्यकारी अभियंता)
३. पी. आर. संवत्सरकर (उपअभियंता)
४. आर. पी. पीसे (उप अभियंता)
५. डी. व्ही. परदेशी (तत्कालीन शाखा अभियंता)
६. पी. बी. जायभाये (तत्कालीन उपअभियंता)
यापूर्वी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या (MJP) ४ बड्या अधिकाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई झाली असून,आता जिल्हा परिषदेचे ६ अधिकारी निलंबित झाल्याने एकूण आकडा १० वर पोहोचला आहे.या कोट्यवधींच्या घोटाळ्याची गंभीर दखल थेट राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आहे.वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वतःलक्ष घालून ही कारवाई केल्यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.या कारवाईमुळे अहिल्यानगर जिल्हा परिषदेत सन्नाटा पसरला असून, येणाऱ्या दिवसांत अजून कोणाकोणाचे पत्ते कट होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
