साहेबांनी जगण्याचा अधिकार हिरावला… एमआयडीसीतील ‘त्या’ नामांकित कंपनीत कर्मचाऱ्याची सुसाईड नोट लिहून आत्महत्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-कॉर्पोरेट क्षेत्रातील एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला असून, एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीत काम करणाऱ्या एका निष्पाप कर्मचाऱ्याला आपल्या प्राणाला मुकावे लागले आहे. ‘जी.के.एन.सेंटर प्राईव्हेट लिमिटेड’ या नामांकित कंपनीत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून होणाऱ्या सततच्या मानसिक आणि शारीरिक छळाला कंटाळून एका कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली.या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार,संबंधित कर्मचाऱ्याला कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सातत्याने अपमानास्पद वागणूक दिली जात होती.या मानसिक छळाची परिसीमा गाठली गेल्याने,अखेर छळाला कंटाळून या कर्मचाऱ्याने आपले जीवन संपवले.
पीडित व्यक्तीच्या पत्नीने धीर दाखवत या अन्यायाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली.
याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ चक्र फिरवून कंपनीच्या बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी मुख्य आरोपींसह समीर शेवाळे, प्लांट हेड पुरुषोत्तम ऋषी आणि सेक्युरिटी बाबासाहेब निर्मळ या चौघांना ताब्यात घेतले असून,उपाध्यक्ष विठ्ठल हंडोरे यांच्यासह इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या भूमिकेचीही चौकशी सुरू आहे.सहाय्यक पोलीस निरीक्षक थोरात आणि पोलीस उपनिरीक्षक मोंढे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
