स्थानिक गुन्हे शाखेची थरारक मोहीम..पहाटेच्या अंधारात झडप..तरुणांच्या आयुष्यात विष कालवणारा ‘तो’ अड्डा उद्ध्वस्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यात अवैध धंदेवाल्यांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कंबर कसली आहे.त्यांच्याच आदेशावरून स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) शेवगाव तालुक्यातील भगुर परिसरात गुरुवारी (दि.९ जुलै २०२६) पहाटेच्या सुमारास एक मोठी आणि धडक कारवाई केली. घराच्या पाठीमागे लपून-छपून चालणाऱ्या एका बेकायदेशीर मावा आणि सुगंधी तंबाखूच्या कारखान्यावर पोलिसांनी मध्यरात्रीनंतर छापा टाकला. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १,२२,८२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला रंगेहात अटक केली आहे,तर मुख्य आरोपी पोलिसांना चकवा देऊन फरार झाला आहे.पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील गुन्हेगारी आणि अवैध व्यवसायांवर कडक कारवाईचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांना दिले होते. त्यानुसार पोउपनि.संदीप दरवडे यांचे पथक शेवगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना,पहाटेच्या सुमारास एका गुप्त बातमीदाराने पोलिसांना अत्यंत गोपनीय माहिती दिली.
भगुर गावच्या शिवारात नितीन ज्ञानदेव पुरणाळे हा आपल्या राहत्या घराच्या पाठीमागे असलेल्या पत्र्याच्या शेडमध्ये मानवी शरीरास अत्यंत घातक आणि अपायकारक असणारी सुगंधी तंबाखू आणि मावा मशीनच्या सहाय्याने बेकायदेशीरपणे तयार करत असल्याची पक्की माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच वेळ न घालवता गुन्हे शाखेच्या पथकाने पहाटेच्या अंधारातच भगुर येथील त्या संशयास्पद पत्र्याच्या शेडवर छापा टाकला. पोलीस अचानक समोर आल्याने तिथे एकच खळबळ उडाली.शेडमध्ये एक तरुण मशीनच्या सहाय्याने मावा तयार करताना पोलिसांना रंगेहात आढळून आला. पोलिसांनी त्याला जागीच ताब्यात घेतले.अटक केलेल्या आरोपीचे नाव संकेत कडुबाळ गरुड (वय २३,रा.भगुर,ता. शेवगाव) असे आहे.त्याची कसून चौकशी केली असता, त्याने हा सगळा काळा धंदा नितीन ज्ञानदेव पुरणाळे (रा. भगुर) याच्या सांगण्यावरून करत असल्याची कबुली दिली. पोलिसांचा छापा पडल्याचे समजताच मुख्य आरोपी नितीन पुरणाळे हा घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस आता त्याच्या शोधात आहेत.या प्रकरणी फरार आरोपी नितीन पुरणाळे आणि अटक केलेला संकेत गरुड या दोघांविरुद्ध शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. ५६७/२०२६ अन्वये नवीन भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५, ३(५) तसेच अन्न सुरक्षा मानके अधिनियम २००६ चे कलम ५९ प्रमाणे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास शेवगाव पोलीस करत आहेत.सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे,पोउपनि संदीप दरवडे,पोलीस अंमलदार गणेश लोंढे,बाळासाहेब नागरगोजे,प्रकाश मांडगे, मनोज साखरे,चालक भगवान धुळे आणि महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीमुळे शेवगाव तालुक्यातील अवैध धंदेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
