कितीही पळा,खाकीपासून वाचू शकत नाही..१ वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खुनातील आरोपीच्या नगर तालुका पोलिसांनी आवळल्या मुसक्या..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील तरुण बळीराम देविदास शिंदे याच्या क्रूर हत्ये प्रकरणातील गेल्या एक वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा मुख्य फरार आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.नगर तालुका पोलिसांनी अत्यंत शिताफीने सापळा रचून या आरोपीला जेरबंद केले.ओंकार उर्फ गोट्या हरकुस बोठे (रा. देऊळगाव सिद्धी,ता.जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या फरार आरोपीचे नाव आहे.या कारवाईमुळे गुन्हेगारी जगतात एकच खळबळ उडाली आहे.२२ जून २०२५ रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गुंडेगाव ते देऊळगाव सिद्धी जाणाऱ्या रोडवरील उतारवाट परिसरात जुन्या वादाच्या कारणावरून बळीराम देविदास शिंदे (वय २८,रा.गुंडेगाव) याची पाच जणांनी मिळून पूर्ववैमनस्यातून आणि कट रचून निर्घृण हत्या केली होती.
याप्रकरणी नगर तालुका पोलीस ठाण्यात बी.एन.एस. कलम १०३(१), ६१(२), ३२४(४), ३(५) अन्वये खुनाचा गुन्हा (गुरनं- ५४०/२०२५) दाखल करण्यात आला होता.या गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली होती. यापूर्वी पोलिसांनी डॅनियल येशुदास जावळे (वय २६,रा. गुंडेगाव),नवनाथ उर्फ राहुल दिलीप राऊत (वय २६,रा. गुंडेगाव),सोन्या उर्फ अमोल चंद्रकांत भुजबळ (वय २४, रा. तांदळी वडगाव) या तिघांना बेड्या ठोकल्या होत्या आणि त्यांच्याविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र (Charge sheet) देखील दाखल केले आहे.मात्र,घटनेनंतर आरोपी क्र. ४ आनंद बाळासाहेब वरकड आणि आरोपी क्र.५ ओंकार उर्फ गोट्या बोठे हे दोघे वर्षभरापासून पोलिसांना हुलकावणी देत फरार होते.पोलीस पथक सातत्याने फरार आरोपींच्या मागावर होते.
अखेर दि.८ जुलै २०२६ रोजी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे नगर तालुका पोलिसांनी थरारक पाठलाग करत आरोपी ओंकार उर्फ गोट्या हरकुस बोठे याला अटक केली.न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक (API) गणेश वारुळे करत आहेत.सदरची धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्म, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि.गणेश वारुळे (नगर तालुका पोलीस स्टेशन),सफौ.दत्तात्रय हिंगडे,
पोहेकाँ.सुभाष थोरात,मंगेश खरमाळे,नितीन शिंदे
पोकाँ.विक्रांत भालसिंग यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.पोलिसांच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
