अहिल्यानगर पोलिसांची मोठी कामगिरी! ‘ऑपरेशन शोध-IV’ अंतर्गत १८ बेपत्ता बालकांची सुटका,कुटुंबांशी घडवून आणली भेट
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच महिला व बाल अपराध प्रतिबंध विभाग, महाराष्ट्र राज्य,मुंबई यांच्या सूचनेनुसार अहिल्यानगर जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या राज्यस्तरीय “ऑपरेशन शोध-IV” या विशेष मोहिमेला मोठे यश आले आहे.या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी अत्यंत कौशल्याने तपास करत एकूण १८ बेपत्ता बालकांचा शोध लावला असून,यामध्ये १० मुली आणि ८ मुलांचा समावेश आहे.मिळालेल्या माहितीनुसार,हरवलेल्या व बेपत्ता असलेल्या अल्पवयीन मुले आणि मुलींचा शोध घेण्यासाठी दि.०८/०६/२०२६ ते दि. २३/०६/२०२६ या कालावधीत अहिल्यानगर जिल्ह्यात ही विशेष मोहीम राबविण्यात आली होती.या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट अल्पवयीन मुला-मुलींचा शोध घेणे हे होते.या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे, विशेष पथके, तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष (AHTU) यांच्यात उत्तम समन्वय साधून अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई करण्यात आली.
मोहिमेदरम्यान शोध घेण्यात आलेल्या सर्व १८ बालकांना आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सुरक्षितपणे त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले आहे.आपल्या हरवलेल्या मुलांना सुखरूप पाहून पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले आणि त्यांनी पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार मानले.ही मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रत्येक एसडीपीओ (SDPO) कार्यालय आणि पोलीस ठाण्यांमार्फत विशेष पथके तयार करण्यात आली होती. गोपनीय माहितीचे संकलन, पोलिसांचे व्यावसायिक कौशल्य आणि इतर जिल्ह्यांच्या पोलीस दलाशी ठेवलेला उत्तम समन्वय याच्या बळावर ही मोहीम फत्ते करण्यात आली.
पोलीस प्रशासनाने आवाहन केले आहे की, अपहरण झालेल्या किंवा बेपत्ता बालकांच्या शोधासाठी अशा मोहिमा पुढेही सुरू राहतील.सदरची मोहीम पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश उगले आणि आर्थिक गुन्हे शाखा अहिल्यानगर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पार पडली.तसेच प्रत्यक्ष कारवाईमध्ये अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष अहिल्यानगरचे पो.नि.किरण शिंदे,सफौ.शकील अहमद शेख,पोहेकॉ.समीर सय्यद, मपोहेकॉ १२४६ ए.आर.काळे, मपोहेकॉ १०८२ ए.के. पवार आणि मपोकॉ १३६५ सी.टी. रांधवन यांनी अथक परिश्रम घेत ही कामगिरी बजावली.
