शहरातील अनधिकृत होर्डिंगबाजांना अंतिम नोटीस..महापालिकेचा १९ बड्या जाहिरातदारांना ७ दिवसांचा ‘अल्टीमेटम’ आता थेट कारवाईचा इशारा!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या आणि नागरिकांच्या जिवाशी खेळणाऱ्या अनधिकृत होर्डिंग व बॅनरवर आता अहिल्यानगर महानगरपालिकेने थेट ‘सर्जिकल स्ट्राईक’ सुरू केला आहे.महापालिका उपायुक्तांनी शहरातील तब्बल १९ प्रमुख जाहिरातदारांना थेट अंतिम नोटीस बजावली असून, कागदपत्रे सादर करण्यासाठी अवघ्या ७ दिवसांची मुदत दिली आहे.या मुदतीत अनधिकृत फलक स्वतःहून न हटवल्यास महापालिका ते जप्त करेलच,शिवाय कारवाईचा संपूर्ण खर्चही संबंधितांच्या खिशातून दंड स्वरूपात वसूल करणार आहे.
शहरातील मुख्य रस्त्यांवर व चौकांत विनापरवाना फलक लावून शहराचे विद्रूपीकरण केले जात होते.वारंवार बैठका घेऊन व सूचना देऊनही नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. या फलकांमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊन नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण झाला होता.
महापालिकेने एलिमेन्टस ड, चंगेडिया आऊट डोअर,साई मार्केटिंग,मातोश्री एंटरप्रायजेस,राजवीर आऊटडोर,डॉ.महांडुळे,साई पब्लिसिटी,स्वामी आऊटडोर मीडिया,हायब्रड पेंटर,अर्जुन मार्केटिंग,रोहन ड्स,साईनाथ आऊट डोअर,स्प्रेड व्हिजन, अमेय आऊट डोअर,अनिल पब्लिसिटी,वशदिप आऊटडोअर,फॉर्च्यून क्राऊन आणि निर्मल क्रिएशन या संबंधितांवर कारवाईचा बडगा उगारत थेट नोटीस जारी केली आहे.
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमानुसार जाहिरात फलक उभारण्यापूर्वी पालिकेची रीतसर पूर्वपरवानगी घेणे सक्तीचे असते. त्यामुळे संबंधितांना २०२० ते २०२६ पर्यंतच्या सर्व परवानग्या, होर्डिंगचे स्ट्रक्चरल स्टेबिलिटी (मजबुती) प्रमाणपत्र, खासगी जागा मालकांचे संमतीपत्र, घरांवरील फलकांची माहिती आणि खांबांवरील जाहिरातींचे अधिकृत आदेश सादर करण्याचे सक्त निर्देश देण्यात आले आहेत.मुदतीनंतर एकाही अनधिकृत फलकाची गय केली जाणार नाही,असा कडक इशारा महापालिका उपायुक्तांनी दिला असल्याने जाहिरातदारांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे.
