गणेशोत्सवात आरोग्याचा गजर! अहिल्यानगरमध्ये राबवणार ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ विशेष मोहीम सहाय्यक धर्मादाय आयुक्तांचे केले अवाहन
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-यंदाच्या गणेशोत्सवात धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच भाविकांच्या आरोग्याचीही काळजी घेतली जाणार आहे. शासनाच्या वतीने १४ सप्टेंबर ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत ‘श्री गणेशा आरोग्याचा २०२६’ हे विशेष अभियान राबविण्यात येणार आहे.या मोहिमेत सर्व नोंदणीकृत धर्मादाय संस्था,न्यास आणि गणेशोत्सव मंडळांनी सक्रिय सहभाग नोंदवून हे अभियान यशस्वी करावे,असे जाहीर आवाहन सहाय्यक धर्मादाय आयुक्त व्ही.डी. शेंडे यांनी केले आहे.या मोहिमेअंतर्गत जिल्ह्यातील नोंदणीकृत गणेशोत्सव मंडळांद्वारे ठिकठिकाणी सामुदायिक आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे.अशा शिबिरांच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्ह्यातील नोंदणीकृत धर्मादाय संस्था, न्यास व मंडळांनी आवश्यक ती मदत पुरवावी,असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 
यामध्ये रुग्णांसाठी अन्न, औषधे,वैद्यकीय साहित्य तसेच आवश्यक आरोग्य सेवांचा पुरवठा करून मंडळांना सहकार्य करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.याशिवाय,नागरिकांमध्ये निरोगी व उत्तम आरोग्याबाबत जनजागृती करणे आणि धर्मादाय रुग्णालयांनी या उत्सव काळात थेट गणेशमंडळांमध्ये जाऊन आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करावीत,अशी सूचना करण्यात आली आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व सामान्य व गरजू नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिरांचा लाभ घ्यावा,असे आवाहन सहायक धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून करण्यात आले आहे.
