अहिल्यानगरात अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई ऐन सणासुदीच्या तोंडावर सुमारे ४ कोटींचे ७५ हजार किलो बटर जप्त ‘ती’ नामांकित कंपनी संशयाच्या भोवऱ्यात..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सणासुदीच्या तोंडावर तुम्ही बाजारातून आणलेले बटर,मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थ खात असाल, तर सावधान राहण्याची गरज आहे.अन्न व औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कडक आदेशानंतर प्रशासनाने अहिल्यानगरात अन्न भेसळी विरुद्ध मोठी धडक मोहीम राबवली आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे कोल्ड स्टोरेजवर मध्यरात्री अचानक टाकलेल्या धाडीत तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपये किमतीचा संशयास्पद बटरचा महासाठा जप्त करण्यात आला आहे.अन्न व औषध प्रशासन (नाशिक विभाग) सह आयुक्त मं.उ.माने यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त (अन्न) गौ.वि. जगताप,अन्न सुरक्षा अधिकारी शप्रदीप प.पवार,अन्न सुरक्षा अधिकारी कि.ध.जगदाळे आणि नमुना सहाय्यक प्र.च. कसबेकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.पथकाने १० सप्टेंबर २०२६ रोजी रात्री एमआयडीसी अहिल्यानगर येथील ‘मे.अरिहंत कोल्ड स्टोरेज’ (गट नं.२३०) वर अचानक धाड टाकली.तपासणी दरम्यान तेथे साठवून ठेवलेले ‘Pasteurized Cooking Butter (Unsalted) (Madurama Creamy Delight)’ हे बटर कमी दर्जाचे असल्याचा संशय आला.तसेच पॅकिंगवरील लेबल वर्णनाचे (Label Regulations) थेट उल्लंघन झाल्याचे उघडकीस आले.यानंतर अधिकाऱ्यांनी तात्काळ ७५,३५६.८ किग्रॅ वजनाचा,सुमारे ४ कोटींचा संपूर्ण साठा जप्त केला.या कारवाईतील अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे,जप्त करण्यात आलेला हा अवाढव्य बटरचा साठा ‘पतंजली फुड्स लि.’ (Patanjali Foods Ltd.) या कंपनीचा असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.अन्न सुरक्षा अधिकारी प्र.प.पवार हे सहाय्यक आयुक्त गौ.वि. जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या दिशेने सखोल तपास करत आहेत.
जप्त केलेल्या साठ्यातून नमुने काढून ते तातडीने विश्लेषणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतर संबंधित दोषींवर कडक कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला जाणार आहे.व्यावसायिक आणि ट्रॅव्हल्स एजन्सींना कडक इशारा येणाऱ्या सणासुदीच्या काळात नागरिकांना स्वच्छ व निर्भेळ अन्न मिळावे,यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. अहिल्यानगर शहरातील सर्व स्वीट मार्ट व खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी कोणत्याही प्रकारचे कमी दर्जाचे,अस्वच्छ ठिकाणी तयार केलेले अन्नपदार्थ विकू नयेत, असा सक्त इशारा प्रशासनाने दिला आहे.तसेच,बाहेरील राज्यातून ट्रॅव्हल्स किंवा इतर वाहनांतून अस्वच्छ पद्धतीने अन्नपदार्थ मागवल्यास संबंधित ट्रॅव्हल्स एजन्सीवरही थेट गुन्हे दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल,अशी तंबी देण्यात आली आहे. नागरिकांना कोणत्याही अन्नपदार्थाच्या भेसळीबाबत संशय किंवा तक्रार असल्यास त्यांनी थेट अन्न व औषध प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त (अन्न) गौ.वि.जगताप यांनी केले आहे.
