नगर तालुका पोलिसांचा अवैध दारू अड्ड्यांवर जोरदार ‘प्रहार’ अरणगाव आणि साकत परिसरातून मुद्देमाल जप्त तिघांवर गुन्हे दाखल..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अवैध देशी दारू विक्री आणि गावठी हातभट्टी अड्ड्यांवर पोलिसांनी शनिवारी (१२ सप्टेंबर) सायंकाळी एकापाठोपाठ एक अशा तीन ठिकाणी धाडी टाकून धडक कारवाई केली.या संयुक्त मोहिमेत पोलिसांनी देशी दारूच्या बाटल्या,तयार हातभट्टी दारू तसेच १ हजार लिटर कच्चे रसायन असा सुमारे ५२ हजार ८५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करत तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.अहिल्यानगर ते दौंड रस्त्यालगत अरणगाव शिवारातील ‘हॉटेल सारंग’च्या आडोशाला सुरू असलेल्या अवैध दारू विक्रीवर सायंकाळी ५:४५ वाजता पोलिसांनी छापा टाकला.या कारवाईत बंडू रामभाऊ ढमढेरे (वय ४५,रा.ढमढेरे मळा, अरणगाव,ता.जि. अहिल्यानगर) याच्याकडून ८५० रुपये किमतीच्या ‘बॉबी संत्रा’ देशी दारूच्या १० बाटल्या जप्त करण्यात आल्या.याप्रकरणी पोलीस हवालदार ई.पी.निपसे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक (ASI) पालवे करत आहेत.अरणगाव गावच्या बसस्थानकामागे असलेल्या पत्र्याच्या आडोशाला गावठी दारूची विक्री सुरू असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास दुसरी धाड टाकली. या कारवाईत अमोल रमेश भिंगारदिवे (वय ३०,रा. प्रियदर्शनी नगर झोपडपट्टी, अहिल्यानगर) याच्या ताब्यातील २० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू (किंमत २,००० रुपये) जप्त करण्यात आली.या कारवाईची फिर्याद पोहेकॉ ई.पी.निपसे यांनी दिली असून,पुढील तपास पोलीस हवालदार शिवाजी खरात करत आहेत.या दोन्ही कारवाया पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे,सहायक पोलीस उपनिरीक्षक पालवे,पोलीस हवालदार गांगुर्डे आणि पोलीस हवालदार खरात यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडल्या.तिसरी मोठी कारवाई साकत परिसरातील सीना नदीपात्रात करण्यात आली.
सायंकाळी ६:४० च्या सुमारास नदीपात्रातील काटेरी झुडपांचा फायदा घेऊन गावठी हातभट्टी चालवली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलिसांनी छापा टाकून संशयित महिला (वय ३४, रा. साकत,ता.जि.अहिल्यानगर) हिच्या अड्ड्यावरून ५० हजार रुपये किमतीचे १,००० लिटर दारू तयार करण्याचे कच्चे रसायन (पत्र्याच्या ड्रममध्ये साठवलेले) जप्त करून नष्ट केले.या कारवाईत पोलीस पोलीस अंमलदार विक्रांत विलास भालसिंग यांनी फिर्याद दिली असून,पोलीस उपनिरीक्षक मोंढे,सहायक पोलीस उपनिरीक्षक हिंगडे आणि पोलीस हवालदार नितीन शिंदे यांनी ही धाड टाकली.प्रकरणाचा पंचनामा नितीन शिंदे यांनी केला असून, पुढील तपास पोलीस अंमलदार करत आहेत.तालुका पोलिसांच्या या सलग धडक कारवायांमुळे परिसरातील अवैध दारू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
