अहिल्यानगर मध्ये राष्ट्रीय लोकअदालतीचा ऐतिहासिक विक्रम:तब्बल ४९,४१९ प्रकरणांचा यशस्वी निपटारा; ४९ कोटी रुपयांची विक्रमी तडजोड..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-‘आपसी सामंजस्य आणि समेट’ या तत्त्वावर आधारित राष्ट्रीय लोकअदालतीला अहिल्यानगर जिल्ह्यात अभूतपूर्व यश मिळाले आहे.शनिवार,१२ सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालय तसेच सर्व तालुका न्यायालयांमध्ये पार पडलेल्या या लोकअदालतीत विक्रमी ४९,४१९ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून, संबंधितांमध्ये सुमारे ४९ कोटी रुपयांची तडजोड घडवून आणण्यात आली आहे.ही लोकअदालत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण (नवी दिल्ली) व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण (मुंबई) यांच्या निर्देशानुसार,अहमदनगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणातर्फे आयोजित करण्यात आली होती.प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिवाजी भ.कचरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा न्यायाधीश-१ व अतिरिक्त सत्र न्यायाधीश राजेश एस.गुप्ता यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला.या लोकअदालतीमध्ये सामान्य नागरिकांशी निगडित अनेक महत्त्वाच्या वादांवर तोडगा काढण्यात आला.
यात प्रामुख्याने:दिवाणी व फौजदारी स्वरूपाची समझोतापात्र प्रकरणे,धनादेश अनादर (Cheque Bounce / कलम १३८) प्रकरणे,बँक कर्जवसुली व पतसंस्थांचे वाद,मोटार वाहन अपघात नुकसानभरपाई दावे,कौटुंबिक व वैवाहिक कलह,कामगार न्यायालयांतील प्रलंबित वाद,महावितरणशी संबंधित तडजोडयोग्य वीज प्रकरणे,न्यायालयात खटला दाखल होण्यापूर्वीची दाखलपूर्व (Pre-litigation) प्रकरणे,दोन्ही पक्षांना विश्वासात घेऊन,सामंजस्याने आणि विनाखर्च न्याय मिळवून देण्यावर भर देण्यात आला. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वादांवर क्षणात तोडगा निघाल्याने पक्षकारांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले.लोकअदालतीच्या या भव्य यशाबाबत बोलताना जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव योगेश सु.पैठणकर यांनी सांगितले की, “न्यायालयीन प्रक्रियेतील वेळ आणि पैसा वाचवून नागरिकांना त्वरित दिलासा देणे हाच या लोकअदालतीचा मुख्य हेतू होता.या उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व सन्माननीय न्यायाधीश,विविध वकील संघटनांचे पदाधिकारी व सदस्य,जिल्हाधिकारी कार्यालय,जिल्हापरिषद प्रशासन तसेच जिल्हा पोलीस दलाचे मोलाचे सहकार्य लाभले. त्याचप्रमाणे सर्व न्यायालयीन कर्मचारी आणि विधी सेवा प्राधिकरणाच्या कर्मचाऱ्यांचे योगदान अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले.वादमुक्त समाजाच्या दिशेने अहिल्यानगर जिल्ह्याने टाकलेले हे पाऊल सर्वसामान्यांना जलद व सुलभ न्याय मिळवून देणारे ठरले आहे.
