खर्डा मर्डर केस..डोळ्यात तिखट अन् डोक्यात कोयता! २४ तासांत एलसीबीने आवळल्या मुसक्या..आरोपींमध्ये ३ अल्पवयीन मुलं निघाल्याने एकच खळबळ..वाचा सविस्तर..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-डोळ्यांत क्षणात झोंबणारी तिखट मिरची पावडर फेकायची आणि पुढच्याच सेकंदाला डोक्यात सपासप जीवघेणा कोयता चालवायचा…खर्डा (ता. जामखेड) येथे घडलेल्या या अंगावर काटा आणणाऱ्या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण अहिल्यानगर आणि धाराशिव जिल्हा हादरून गेला होता. मात्र,अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ने अवघ्या काही तासांत चक्रे फिरवून या अंधाऱ्या खुनाचा उलगडा केला आहे.या हत्याकांडाचा मुख्य सूत्रधार प्रसाद अशोक अडागळे याच्यासह तब्बल ३ अल्पवयीन साथीदारांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.दि.११ सप्टेंबर रोजी माळेवाडी (ता.भूम,जि. धाराशिव) येथील तान्हाजी भास्कर बोराडे हे खर्डा (ता. जामखेड) येथे आले असताना मोटारसायकलवरून आलेल्या मारेकऱ्यांनी त्यांच्यावर दबा धरून हल्ला केला.आरोपींनी क्षणाचाही विचार न करता तान्हाजी बोराडे यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकली आणि डोक्यात कोयत्याने सपासप वार करून त्यांना जागीच रक्ताच्या थारोळ्यात ठार मारले.या थरारक घटनेनंतर खर्डा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर १५८/२०२६, बीएनएस (BNS) कलम १०३(१), ३(५) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
खुनाची घटना गंभीर असल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन व अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपासाचे थेट आदेश दिले.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी तत्काळ हालचाली करत पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव यांच्या नेतृत्वात एक विशेष तपास पथक तयार केले.पोलीस अंमलदार शाहीद शेख, अभिजीत अरकल,शामसुंदर जाधव,भाऊसाहेब काळे, अमोल आजबे,अजिनाथ पाखरे,रमीजराजा आत्तार, अरूण मोरे,फुरकान शेख आणि प्रशांत राठोड या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाची पाहणी करून तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांचे जाळे सक्रिय केले.अवघ्या दोन दिवसांत (१३ सप्टेंबर) हा भयानक खून प्रसाद अशोक अडागळे याने आपल्या ३ अल्पवयीन मित्रांच्या मदतीने केल्याची पक्की माहिती समोर आली.
मुख्य आरोपी पुण्यामध्ये लपून बसल्याची खात्रीशीर खबर मिळताच एलसीबीच्या पथकाने पुण्यात धाव घेतली आणि पुणे शहरातून पहिल्या संशयिताला बेड्या ठोकल्या विधीसंघर्षीत बालक (वय १७ वर्षे,रा.भूम,ता.भूम,जि. धाराशिव) याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आले.त्यानंतर पथकाने मोर्चा टाकळीमिया (ता.राहुरी) कडे वळवला आणि तेथून मुख्य मारेकऱ्यासह इतर अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले.स्थानिक गुन्हे शाखेने पकडलेला मुख्य आरोपी प्रसाद अडागळे आणि तिन्ही विधीसंघर्षित बालकांना पुढील कायदेशीर कारवाई व सखोल तपासासाठी खर्डा पोलीस ठाण्याच्या स्वाधीन केले आहे.हा खून नेमका कोणत्या जुन्या वैमनस्यातून किंवा कारणावरून झाला, याचा पुढील तपास आता खर्डा पोलीस करत आहेत.एलसीबीच्या या धडक आणि वेगवान कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले आहेत.
