संगमनेर प्रतिनिधी(दि.१७ मे):-लग्न समारंभाकरीता आलेल्या एका 9 वर्षाच्या चिमुरडीला शेतात नेवून एका नराधमाने तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी परिसरात सोमवारी ता.१५ रोजी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी परिसरात एका तरुणाचा विवाह होता. त्यासाठी काही पाहुणे मुंबईहून गावाकडे आले होते. त्यांच्यासोबत नऊ वर्षांची मुलगी ही आलेली होती.सदर मुलगी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास लघुशंकेसाठी गेली असता रमेश सांगळे याने मी तुला तुझ्या आजीकडे नेतो असे सांगितले.यामुळे सदर मुलगी त्याच्यासोबत निघाली. तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत त्याने तिच्यावर शेतात नेवून अत्याचार केला.बराच वेळ झाला तरी तू लवकर आली नाही,कुठे बसली होती?असे तिच्या आईने विचारले असता तिने सांगितले की रमेश सांगळे याने तिला शेतात नेले होते. तेथे तो काय-काय बोलला आणि काय-काय केले हे सांगितले.काय त्रास होतोय हे देखील तिने सांगितले.यानंतर संतापलेल्या अत्याचारित बालिकेच्या आईने तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.या फिर्यादीवरून पोलिसांनी रमेश जयराम सांगळे (वय 40,धंदा-शेती, रा.सोनेवाडी,ता.संगमनेर) याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम 376 (अ. ब), 376(2)(एफ) सह बालकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा 2012 चे कलम 4.8.12 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस निरीक्षक ढोमणे हे करत आहे.रमेश जयराम सांगळे यास पोलिसांनी अटक करुन न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
