जामखेड प्रतिनिधी(दि.६ जुन):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला 9 वर्षे पुर्ण झाले. यानिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने 30 मे ते 30 जून 2023 दरम्यान एक विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले असून या अंतर्गत संपूर्ण देशात विविध कार्यक्रम,उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.यासाठी निवडक पदाधिकार्यांची टिम तयार करुन विविध प्रदेशात मोदी सरकारच्या योजनांचे अंमलबजावणी व पुढील ध्येय धोरणे याचा प्रचार व प्रसार करण्यासाठी नेमण्यात आली आहे.या अंतर्गत आ.राम शिंदे यांची झारखंडचे सहप्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे,तसे पत्र भाजपाचे राष्ट्रीय महामंत्री तरुण चुग यांनी दिले आहे.भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा व महामंत्री बी.एल.संतोष यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येकी चार लोकसभा मतदार संघासाठी ही टिम तयार करण्यात आली आहे.यामध्ये प्रभारी व सहप्रभारी नियुक्त झालेले पदाधिकारी संबंधित लोकसभा क्षेत्रात जाऊन तेथील केंद्र सरकारच्या योजनांची होत असलेली अंमलबजावणी, योजनांचा लाभ मिळालेल्यांच्या प्रतिक्रिया,भाजपा पक्षाची तेथील स्थिती बाबत खासदार, आमदार,पक्षाचे पदाधिकारी,कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून आढावा घेणार आहेत.या महत्वाच्या अभियानात आ.प्रा.राम शिंदे यांची निवड होणे ही त्यांच्या कार्या कर्तुत्वाची ओळख आहे.यापुर्वीही त्यांच्यावर गोवा,कर्नाटक राज्यातील विधानसभा निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली होती.पक्षांतर्गत आ.प्रा.राम शिंदे यांचे महत्व वाढत असल्याने त्यांच्यावर केंद्रीय पातळीवर वेगवेगळ्या जबाबदार्या देण्यात येत आहे.
