अहमदनगर प्रतिनिधी(दि.१२ जुन):-आज दि.१२ जून २०२३ रोजी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, अहमदनगर आणि स्नेहालय चाईल्ड लाईन,अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्लीगेट येथे जागतिक बालकामगार विरोधी दिन जनजागृती मोहीम रॅलीला सहाय्यक कामगार आयुक्त श्री. नितिन कवले,चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक श्री. महेश सूर्यवंशी,स्नेहालय बालभवनचे प्रकल्प समन्वयक सौ.उषा खोल्लम यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून सुरुवात झाली. शहरातील दिल्लीगेट,चौपाटी कारंजा चौक,नेहरू मार्केट, चितळे रोड,तेलीखुंट,कापड बाजार,सहकारी बँक चौक, आनंदी बाजार,घुमरे गल्ली, गांधी मैदान आदी परिसरात जाऊन जागतिक बालकामगार विरोधी दिनाविषयी रॅली काढुन सर्व दुकानदार रिक्षाचालक, पादचारी,बालके, व्यावसायिक आदींना बालकांच्या हस्ते माहिती पत्रक व गुलाबपुष्प देऊन बालकामगार जनजागृती मोहीम राबविण्यात आली.कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सहाय्यक कामगार आयुक्त श्री. नितिन कवले यांनी त्यांचे मत व्यक्त करत असताना बालकामगार हि देशाची उतरती कळा आहे,कारण आजचा बालक हा उद्याचा भारत घडवणार आहे.त्यामुळे बालकांना कामाला लावण्यापेक्षा त्याला शाळेत पाठवा.बालकामगार या अनिष्ठ रुढीचे समुळ उच्चाटन करण्याकरीता शासनाबरोबरच सामान्य नागरिकाची यात महत्वाची भूमिका आहे.त्यामुळे जागरुक नागरिक म्हणुन आपल्या आसपास 18 वर्षांपेक्षा कमी वयाचे कामगार काम करत असतील तर ताबडतोब सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय,चाईल्डलाईन संस्था किंवा जवळच्या पोलिस स्टेशनमध्ये कळवावे.तसेच कोणत्याही दुकानात,कारखान्यात,चहा टपरी अथवा कोणत्याही व्यवसायात बालकामगार ठेवू नयेत.बालकामगार कामावर ठेवणे कायदयाने गुन्हा आहे असे आवाहन करण्यात आले.चाईल्ड लाईनचे केंद्र समन्वयक श्री.महेश सूर्यवंशी यांनी त्यांचे मत व्यक्त करत असताना बालकामगारामुळे बालकांचे भविष्य नष्ट होत आहे.तसेच या घातक कामामुळे बालकांच्या मनावर व आरोग्यावर वाईट परिणाम होतात पर्यायाने बालकांचा शारीरीक व मानसीक विकास खुंटुन जातो.आपल्या देशातील बालकाने जर शिक्षण घेतले,तरच ते देशाचे नाव उंचाऊ शकतील, जर आपण बालकामगार प्रथा नष्ट केली तर भारत देशातील लहान बालके आपल्या देशाला उंच भरारी व यश देऊ शकतील.अशा संदेशाव्दारे जनजागृती करण्यात आली. यावेळी मी बालकामगार ठेवणार नाही,प्रत्येक बालकास शिक्षणाचा हक्क देण्यासाठी तत्पर असेल, बालकांच्या हक्कांचे हनन होऊ देणार नाही.अशी प्रतिज्ञा नागरिकांकडून वदवून घेण्यात आली.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयाचे तुषार बोरसे सरकारी कामगार अधिकारी,ललित दाभाडे, अंबादास केदार,प्रकाश भोसले,व चाईल्ड लाईनचे अलीम पठाण,शाहीद शेख, राहुल कांबळे,वसिम शेख, राहुल वैराळ,मंजुषा गावडे, सीमा कांबळे,स्नेहालय बालभवनचे जयश्री शिंदे, विना वड्डेपल्ली व स्वयंसेवक गीता आढाव,सायली कव्हाने यांनी परिश्रम घेतले.
