संगमनेर प्रतिनिधी (दि.१३ जुन):-पोलीस असल्याची बतावणी करून पल्सर मोटार सायकलवरुन आलेल्या दोघा चोरट्यांनी सेवानिवृत्त कर्मचार्याच्या गळ्यातील सोन्याची चैन,हातातील चार सोन्याच्या अंगठ्या व एक चांदीची अंगठी असा सुमारे पावणेतीन लाख रुपयांचा ऐवज लांबून पलायन केले.ही घटना दि.१२ जुन रोजी दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास शहरातील अकोले नाका परिसरात घडली.धामणगाव रोड धुमाळवाडी ता.अकोले येथील सेवानिवृत्त कर्मचारी लक्ष्मण पंढरीनाथ धुमाळ हे आपल्या वाहनामधून संगमनेर येथील अकोले नाका परिसरातून जात होते.दुपारी सव्वाबारा वाजेच्या सुमारास काळ्या रंगाचे पल्सर मोटारसायकल वरुन समोरुन आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी धुमाळ यांच्या गाडीसमोर त्यांची गाडी उभी करुन पोलिस असल्याची बतावणी करुन धुमाळ यांच्या गळ्यातील चैन,हातातील चार सोन्याच्या अंगठ्या व एक चांदीची अंगठी काढण्यास सांगितले.हे दागिने एका कागदाचे पुडीत बांधून त्या डिकीमध्ये ठेवताना हात चलाखी करुन दागिने ठेवलेल्या पुडीच्या ऐवजी वाळुची पुडी ठेवुन दोघे चोरटे पसार झाले.या चोरट्यांनी 2 लाख 10 हजार रुपये किमतीची 70 ग्रॅम ची गळ्यातील सोन्याची चैन,22 हजार 500 रुपयांची साडेसात ग्रॅमची सोन्याची अंगठी,15 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्याा अंगठ्या,असा एकूण 2 लाख 64 हजार रुपयांचे दागिने चोरून पलायन केले.याबाबत लक्ष्मण पंढरीनाथ धुमाळ (वय 69 वर्षे) यांनी शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दोघा अज्ञात चोरट्यांविरुद्ध गु.र.नं.474/2023 भादंविक 420,170,34 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहेे.पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल पवार हे करीत आहे.
