अहमदनगर प्रतिनिधी(१९ जुलै):-आठ वर्षांपूर्वी संजयनगर झोपडपट्टीमधील बालभवनचा विद्यार्थी विकास गवळी याने हाॅटेल मॅनेजमेंटचे शिक्षण घेत सहारा सर्व्हिसेसच्या माध्यमातून वीस तरुणांना एमआयडीसीत रोजगार उपलब्ध करुन दिला.त्याच्या पावलावर पाऊल ठेवत व अहमदनगरकरांची गरज ओळखून गिरीश गवळी याने “व्ही जी फ्रेश फ्रूट्स”चा व्यवसाय सुरू केला आहे.या व्यवसाय व्दारे आरोग्यदायी ताजे रसरशीत सेंद्रिय फळे अल्पदरात हॉस्पिटल मधील रुग्ण,ज्येष्ठ नागरिक व गरजूंना घरपोहोच सेवा व्दारे उपलब्ध केली जाणार आहे.स्नेहालय प्रतिसाद केंद्रात डॉ. गिरीश कुलकर्णी,ज्येष्ठ पत्रकार भूषण देशमुख, संचालक हनिफ शेख आणि मुंबई येथील करी स्टोन संस्थेचे श्री. शशांक मित्तल यांच्या हस्ते “व्ही जी फ्रेश फ्रूट होम डिलिव्हरी”चे उदघाटन झाले.स्नेहालयने २००३ मध्ये संजयनगरमध्ये बालभवन प्रकल्प सुरु केला.गरिबी, शोषण,गुन्हेगारी,विषमता, मूलभूत सोयी-सुविधांचा अभाव, व्यसनाधीनता अशा विविध समस्यांनी त्रस्त असलेल्या या भागातील ९८ टक्के मुले-मुली शिक्षण घेत नव्हत्या.८५ टक्के बाल कामगार होते. त्यांना शिक्षण व संस्कार देण्यास बालभवनने सुरूवात केली. संजयनगरसह रामवाडी, सिद्धार्थनगर,मुकुंदनगर, भिंगार,लालटाकी या भागात सुरू झालेल्या या प्रकल्पाला हळूहळू व्यापक स्वरुप येऊ लागले.बालभवनामुळे संजयनगरमध्ये खूप सकारात्मक बदल झाले आहेत.अनेक युवकांना बेरोजगारीतून मुक्तता मिळाली आहे.होम डिलिव्हरी बेसवर “व्ही जी फ्रेश फ्रुट्स”चा व्यवसाय सुरू करण्यासाठी माझ्या पंखांना बळ देण्याचे काम बालभवनाने केले,असे गिरीश गवळी याने सांगितले.
स्वावलंबनाची दिशा
बालभवनातील मुला-मुलींना पारंपरिक शिक्षणासह कौशल्य आधारित प्रशिक्षण देण्यास प्राधान्य दिले जाते. प्रत्येक होतकरू मुलगा स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभा राहण्यासाठी डॉ.विनय कोपरकर सरांच्या मार्गदर्शनाखाली “सुपर 40” या उपक्रमाव्दारे विषेश प्रयत्न केले जातात, असे संचालक हनिफ शेख यांनी सांगितले. आठ वर्षांपूर्वी सहारा सर्व्हिसेस सुरू करून टॉयलेट व बाथरुम,ऑफिस, घर-फ्लॅट व वर्कशॉप स्वच्छता,हाऊस किपिंग, पाण्याची टाकी स्वच्छता, ड्रेनेज चोकअप,सेफ्टी टँक स्वच्छता,पेस्ट कंट्रोल,कार वॉशिंग अशा विविध सेवा तरूण देत असून मिळणाऱ्या उत्पन्नाचा काही भाग बालभवनातील मुलांच्या शिक्षणासाठी ते खर्च करतात, असे शेख यांनी सांगितले.
