अहमदनगर (दि.२८ ऑगस्ट):-पाथर्डी तालुक्यातील वैजू बाभुळगाव येथील लोकनियुक्त महिला सरपंच ज्योती घोरपडे व त्यांच्या कुटुंबीयांना मारहाण केल्या प्रकरणी उर्वरित मुख्य आरोपींना अटक होत नसल्याच्या निषेधार्थ सरपंचसह ग्रामस्थांनी दि.२५ ऑगस्ट रोजी अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलेले उपोषण अखेर चौथ्या दिवशी २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ५.०० वा.सुमारास मागे घेण्यात आले.
पाथर्डी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश राजगुरू यांनी जिल्हाधिकारी कार्यालय समोर उपोषणकर्त्यांची भेट घेऊन आरोपींना येत्या दहा दिवसात अटक केली जाईल असे आश्वासन दिल्यानंतर वैजू बाबुळगाव येथील ग्रामस्थांनी त्यावर विश्वास ठेवून उपोषण मागे घेतले.परंतु येत्या दहा दिवसात जर आरोपी अटक झाले नाही तर हे आमरण उपोषण दहा दिवसांनंतर जिल्हाधिकारी कार्यालय समोर पुन्हा तीव्र स्वरूपात केले जाईल असा इशारा वैजु बाभूळगावच्या सरपंच ज्योती घोरपडे यांनी यावेळेस दिला.
