
अहमदनगर (दि.२६ सप्टेंबर):-शेवगाव दंगल प्रकरणाची सखोल व निपक्षपातीपणे चौकशी करावी.या प्रकरणात दोषी असणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कडक कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रा. किसन चव्हाण यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्याकडे तक्रार अर्जाद्वारे केली आहे.
सोमवारी सायंकाळी त्यांनी अहमदनगरचे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रार अर्ज सादर केले. यावेळी त्यांच्या समवेत वंचित बहुजन आघाडीचे ॲड.डॉ.अरुण जाधव,ॲड. दिपक श्यामदिरे, ॲड. कुणाल सरोदे, ॲड. योगेश गुंजाळ,जिल्हाध्यक्ष प्रतीक बारसे,जिल्हा महासचिव योगेश साठे,जीवन पारधे,मारुती पाटोळे,अनिल जाधव,डॉ. जालिंदर घिगे,रवींद्र म्हस्के,बन्नो भाई शेख,अरविंद सोनटक्के,प्रकाश भोसले,सुधीर ठोंबे, सुनीता जाधव,जयश्री बरकडे आदी उपस्थित होते.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल.असे आश्वासन प्रा.किसन चव्हाण यांना दिले. दिलेल्या निवेदनात प्रा. किसन चव्हाण यांनी म्हटले आहे की, शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी आपल्या दिड वर्षांच्या कार्यकाळात केलेल्या अकार्यक्षम कारभाराच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने प्रा. किसन चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली शेवगाव व पाथर्डी तालुक्यात अनेक वेळा मोर्चे व आंदोलने केली होती. या गोष्टीचा राग मनात धरून, कट रचून पूर्वग्रह दूषित भावनेने कारवाई केली. वास्तविक पाहता शेवगाव मध्ये दंगल घडली तेव्हा मी औरंगाबादला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. त्या दिवशीचे सकाळी ९:३० ते सायंकाळी ६:३० पर्यंतचे सीसीटिव्ही फुटेज, पोलीस निरीक्षक विलास पुजारी, संतोष मुटकुळे, डी. वाय. एस. पी. संदीप मिटके, अजित पाटील यांच्या संभाषणाचे कॉल रेकॉर्ड, प्रा. किसन चव्हाण यांचे टॉवर लोकेशन व कॉल डिटेल्स रिपोर्ट जतन करून ठेवावेत असे आदेश शेवगाव कोर्टाने दिले आहे.
असे असताना शेवगाव चे पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांनी मला अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन जातीवाचक शिवीगाळ व दमडाती केली की, का रे पारदाडा लई हरबी आली का. डी. वाय. एस. पी. संदीप मिटके व अजित पाटील यांच्या कडे माझी तक्रार करतो का आता बघ तुझी कशी ठोकून मारतो. निट नोकरी कर आमची बरोबरी करतो का ? आमदारकीला उभा राहिला म्हणजे आमदार झाला का ? तुझ्या नशिबाने तू मागे २-३ वेळा माझ्या कचाट्यातून वाचलास नाहीतर तुझा कार्यक्रम झाला असता. अशा भाषेत दमदाटी केली त्यावर मी कुठलीही प्रतिक्रिया न देता घरी निघून आलो. दुसऱ्या दिवशी दंगलीच्या गुन्ह्यात त्यांनीं माझे नाव आरोपी म्हणून घेतल्याचे मला समजले. वास्तविक पाहता गुन्हा घडला तेव्हा मी औरंगाबादला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तरीही जाणीवपूर्वक मला व माझ्या कार्यकर्त्यांना या दंगलीच्या गुन्ह्यात अडकवले. त्याचबरोबर शेवगावच्या अनेक निरपराध तरुणांनाही या दंगल प्रकरणात अटक केली. त्यामुळे त्यांचे करिअर बरबाद झाले आहे. या सर्व गोष्टीला शेवगावचे पोलीस निरीक्षक विलास पुजारी, डीवायएसपी संदीप मिटके व अजित पाटील हेच जबाबदार आहेत. तरी त्यांच्याविरुद्ध अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा अन्वये गुन्हा दाखल करावा व त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी कायदेशीर मार्गाने ही लढाई लढेल असा इशारा प्रा. किसन चव्हाण यांनी दिला.