
अहमदनगर (दि.९ ऑक्टोबर):-अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर तालुक्यामध्ये हरेगाव,उंदीरगाव येथे दि.२६ ऑगस्ट २०२३ रोजी माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली होती.शेळी व कबुतरे चोरल्याच्या संशयावरून तालुक्यातील हरेगाव परिसरातील चार मुलांना सहा जणांनी आपल्या शेतातील विहिरीवर नेऊन अमानुषपणे अर्धनग्न करून बेदम मारहाण केली.
व याचे निर्दयी मारहाणीचे व्हिडिओ,फोटो सोशल मीडियात व्हायरल झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली होती. आरोपींना तात्काळ अटक करून कडक शासन व्हावे या मागणीसाठी ग्रामस्थांनी हरेगाव बंद ठेऊन घटनेचा निषेध केला होता.काही आरोपींना पोलिसांनी अटक केली मात्र या घटनेने संपूर्ण अहमदनगर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात आंदोलने झाली. युवराज नाना गलांडे,मनोज बोडखे,पप्पू पारखे,दीपक गायकवाड, दुर्गेश वैद्य,राजू बोरगे या सहा जणांनी शेळी व कबुतरे चोरल्याच्या संशयावरून गावातील शुभम माघाडे,कुणाल मगर,ओम गायकवाड,प्रणय खंडागळे यांना गलांडे यांच्या शेतातील विहिरीवर नेले.तेथे त्यांना अर्धनग्न करून दोरीने पाय बांधून अमानुषपणे मारहाण केली.परंतु यातील फरार आरोपी नानासाहेब गलांडे याला तात्काळ अटक करण्यात यावी व सामाजिक न्याय विभागाकडून सदर घटनेतील पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक मदत द्यावी या मागणी करता रिपाई अहमदनगर सर्व आंबेडकरी चळवळ पक्ष संघटना यांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे मंगळवार दि.१० ऑक्टोबर २०२३ रोजी दु.१२.०० वाजेपासून बेमुदत उपोषण करणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) उत्तर जिल्हाध्यक्ष सुरेंद्रभाऊ थोरात यांनी सांगितले.