
अहमदनगर (दि.९ ऑक्टोबर):-शेवगाव तालुक्यातील भायगाव येथे अवैध वाळु चोरी व वाहतुकी विरुध्द धडक कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल 5,10,000/- रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला यांनी पोनि/श्री.दिनेश आहेर, स्थागुशा यांना जिल्ह्यातील अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे बाबत आदेशित केले होते.नमुद आदेशान्वये पोनि/श्री.दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस अंमलदार याचे पथक नेमुन अवैध वाळु उत्खनन/उपसा व वाहतुकी विरुध्द कारवाई करणे कामी रवाना केले होते.सदर पथक शेवगांव परिसरात अवैध वाळु उत्खनन/उपसा बाबत माहिती काढत असताना पोनि/श्री. दिनेश आहेर यांना गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,भातकुडगांव ते भायगाव रोडवर,भायगांव शिवार,ता.शेवगांव या रोडवर एक विना नंबरचा निळे रंगाचा ट्रॅक्टर विनापरवाना वाळुने भरुन येणार आहे.आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने प्राप्त माहिती पथकास कळवुन सदर ठिकाणी जावुन खात्री करुन कारवाई करणेबाबत सुचना दिल्याने पथकाने तात्काळ शेवगांव पोलीस स्टेशनचे अंमलदार व पंचाना सोबत घेवुन भातकुडगांव ते भायगाव रोडवर,लक्ष्मीमाता दुध संकलन केंद्र या ठिकाणी सापळा लावुन थांबलेले असताना एक विना नंबर निळे रंगाचा ट्रॅक व ट्रॉली येताना दिसली.
पथकाची खात्री होताच त्यास हात दाखवुन थांबण्याचा इशारा केला असता ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टर थांबविला.त्यास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) संजय रंगनाथ उगले (रा. आखातवाडे,ता.शेवगांव) असे असल्याचे सांगितले.ट्रॅक्टर चालकाचे कब्जातील ट्रॅक्टर ट्रॉलीची पाहणी करता त्यामध्ये वाळु दिसुन आली. चालकास वाळु उपसा व वाहतुकीचे परवान्या बाबत विचारपुस करता त्याने त्याचेकडे शासनाचा वाळु वाहतुकीचा कोणताही परवाना नसले बाबत सांगितले.त्यास ट्रॅक्टर मालका बाबत विचारपुस करता त्याने ट्रॅक्टर मालक व चालक मी स्वत: आहे अशी माहिती दिल्याने त्यास ताब्यात घेतले.
ताब्यात घेतलेल्या आरोपीने अवैधरित्या शासनाचा कोणत्याही प्रकारचा परवाना न घेता किंवा रॉयल्टी न भरता शासकिय मालकिची वाळु अवैधरित्या चोरी केल्याने 5,10,000/- रुपये किंमतीचा एक निळे रंगाचा ट्रॅक्टर, ट्रॉली व 1 ब्रास वाळुसह ताब्यात घेवुन त्यांचे विरुध्द शेवगांव पो.स्टे.गु.र.नं. 966/23 भादविक 379 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास शेवगांव पो.स्टे. करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.प्रशांत खैरे अपर पोलीस अधिक्षक व श्री. सुनिल पाटील उपविभागीय पोलीस अधिकारी,शेवगांव विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोकॉ/शिवाजी ढाकणे,किशोर शिरसाठ व बाळासाहेब खेडकर यांनी केलेली आहे.