Maharashtra247

आमचं लग्न होईल की नाही? मराठा वधुवर मेळाव्यात अनेक तरुणांचा प्रश्न 

श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.३१ ऑक्टोबर):-सकल मराठा समाज व मराठा सोयरीक संस्था यांच्या वतीने श्रीगोंदा येथे मोफत वधू वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

या मेळाव्यात अनेक मराठा मुलांनी एकच प्रश्न विचारला .. की आम्हांला आयुष्यभरासाठी मुलगी मिळेल की नाही? आमचं लग्न होईल की नाही? मराठा समाजातील मुलांना आरक्षण नसल्यामूळे नोकरी मिळत नाही.मग नोकरी नसल्यामूळे कोणतीही मुलगी या मुलांसोबत लग्न करायला तयार होत नाही.हा अतिशय गंभीर प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक गावामध्ये तयार झालेला आहे,असे मत या मेळाव्याच्या उदघाटन प्रसंगी मराठा सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे यांनी व्यक्त केले.

रविवार दि. 29 ऑक्टोबर 2023 रोजी श्रीगोंदा येथील शनि चौकात पंतनगर कम्युनिटी हॉलमध्ये हा 76 वा मोफत मेळावा आयोजीत करण्यात आला होता.या मेळाव्यासाठी श्रीगोंदा नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष मनोहर पोटे, छत्रपती संभाजी महाराज सेवा समितीच्या महाराष्ट्र राज्य महिलाध्यक्ष भारती इंगवले,नगर परिषदेचे नगरसेवक सुनिल वाळके, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अरविंद कापसे,मराठा सेवा संघाचे तालुका सचिव बाळासाहेब भोर,मराठा उद्योजक लॉबीचे जिल्हा संघटक सागर मोरे,राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे तालुका उपाध्यक्ष संजय खामकर, विजय लंके सर,मधुकर रसाळ इ.मान्यवर उपस्थित होते.श्रीगोंदा येथील शनी चौकातील पंतनगर येथील या मोफत मेळाव्यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यातून वधू-वर पालक आले होते, तेथे एकूण नाव नोंदणी 170 झाली. तयापैकी फक्त वीस मुलींची नोंदणी झाली व 150 मुलांची नोंदणी झाली.

एवढी मोठी तफावत मुला मुलींमध्ये नेहमी दिसून येते.मागच्या आठवड्यात 75 वा मोफत मेळावा संभाजीनगर येथे पार पडला होता तेथे देखील अशीच तफावत होती. श्रीगोंदा मेळावा मधील या 150 मुलांपैकी 130 मुलांना नोकरी नाही त्यामुळे या मुलांच्या लग्नाचा प्रश्न अतीगंभीर आहे,म्हणून शासनाने या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी पूर्ण समाजातून होत आहे.तसेच नगर व पुणे जिल्ह्यात आणखी पुढील मोफत मेळावे होणार आहेत अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष अशोक कुटे यांनी दिली.हा मेळावा यशस्वी करण्यासाठी प्रा.योगेश कोतकर,ताई पवार (गायकवाड),नितीन घालमे सर,संतोष खोमणे सर,पुजा पवार,जयश्री कुटे,प्रमोद झावरे,सीमा भोसले,निलेश शेलार यांनी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

You cannot copy content of this page