
संगमनेर (राजेंद्र मेढे):-सध्या थंडीचे दिवस असताना ढगाळ वातावरण तयार झाले असून संगमनेर तालुक्यातील रब्बी पिकांवर मोठ्या प्रमाणात रोग पडला आहे.यामुळे तालुक्यातील शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.
खरीप हंगामातील पिके पावसाभावी वाया गेली असल्यामुळे रब्बी पिकांवर शेतकऱ्यांची मदार अवलंबून आहे.थोड्याफार झालेल्या पावसावर आधारित गहू,हरभरा,ज्वारी पेरण्यात आली.ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने हरभरा,गहू,तुर पिकावर मोठ्या प्रमाणात रोगराई पसरली आहे.पिकांची पाने पिवळी पडली असून अळी तयार झाली आहे.पिकांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो.गेल्या आठ दिवसांपासून प्रखर असा सूर्यप्रकाश पडला नाही त्यामुळे पिवळी पडलेल्या पिकांवर फवारणी करण्याची वेळ आली आहे.
फवारणी करण्यासाठी शेतकऱ्यांना मोठा आर्थिक खर्च येत असल्याने रब्बीची पिके देखील धोक्यात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.तूर, हरभरा ही पिके शेतकऱ्यांना रब्बीचे उत्पन्न मिळवून देतात.तुरीचे पीक चांगले बहरले असून रोगाने त्यावर अतिक्रमण केले आहे.तूर खूप वाढत असल्याने फवारणी मारणे जास्त शक्य नसते परिणामी शेतकरी फवारणी करणे टाळतात त्यामुळे उत्पन्न क्षमता कमी होते.हरभरा पिकावर देखील पडलेला रोग उत्पन्नावर परिणाम करणार आहे.अवकाळी पावसाने संकट येण्याची चिन्हे असल्याने शेतकरी चिंताग्रस्त बनला आहे.मक्याची कणसे अजून तशीच पडलेली असून पावसामुळे त्यांना सुद्धा धोका निर्माण होणार आहे.अवकाळी पाऊस,ढगाळ वातावरण यामुळे रब्बीची पिके देखील धोक्यात सापडली आहेत.