
अहमदनगर (दि.११ जानेवारी):-ठेवीदारांच्या ठेव रकमांची मुदत संपल्यानंतरही रकमा परत देण्यास टाळाटाळ करुन ठेवीदारांची फसवणूक केल्या प्रकरणी श्रीरामपूर येथील श्रीसंत नरहरी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक व आजी-माजी संचालकां विरोधात शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या पतसंस्थेतील ठेवीदार सनी अंबिलवादे यांनी या बाबत फिर्याद दिली.पतसंस्थेत फिर्यादी अंबिलवादे यांचे वडील किशोर अंबिलवादे यांनी काही रक्कम मुदती ठेव ठेवली होती.शेती विकलेली काही रक्कम आजारपणावर खर्च केली.तसेच राहिलेल्या रकमेची मुदत ठेव संत नरहरी महाराज पतसंस्थेत २००६ सालामध्ये ठेवली.यानंतर किशोर आंबिलवादे व पत्नी कल्पना किशोर आंबिलवादे हे दोघे मृत पावले.पतसंस्थेच्या संचालक मंडळाने त्यांच्या नावावरील मुदत ठेव पावत्या मुलांच्या नावावर केल्या.
त्या पावत्यांची मुदत संपल्याने फिर्यादीने आंबिलवाने यांनी पतसंस्थेमध्ये रक्कम मागितली असता, संचालकांनी रक्कम देण्यास टाळाटाळ केली.सुभाष लांडगे,पांडू नवनाथ धनवटे, सचिन विष्णू कांबळे,अब्बास लालखॉ पठाण या ठेवीदारांची सुद्धा २२.१०९ लाख रुपये व ठेवीदारांची फसवणूक करून रकमेचा अपहार केल्याचे आंबिलवादे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.या प्रकरणी २२ जणांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भादंवि.कलम ४२०,४०६ आदी कलमांन्वय्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.