
अहमदनगर (दि.३ फेब्रुवारी):-आपल्याला आमदारकी,मंत्री पदाची कुठलीही फिकीर नसून ओबीसी समाजाच्या न्याय हक्कासाठी आपण शेवटपर्यंत लढणार आहोत.

त्यामुळे कुठल्याही दबावाला बळी न पडता संपूर्ण ओबीसी समाजाने एकत्र येऊन लढलं पाहिजे असे प्रतिपादन राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले.ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार मेळावा आज अहमदनगर येथे पार पडला.
यावेळी ते बोलत होते.ते म्हणाले की,आज आपले प्रश्न सोडविण्यासाठी ओबीसी समाजाने कुठल्याही दबावाला बळी न राहता एकत्र येऊन लढलं पाहिजे. आज ही वेळ ओबीसींवर आली आहे. उद्या ती दलित, आदिवासीवर देखील येईल त्यामुळे या लढ्यात ओबीसी बांधवांसोबत दलित आदिवासी बांधवानी देखील साथ महत्वाची असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच बिहार आणि आंध्र प्रदेश प्रमाणे महाराष्ट्र सरकारने देखील जातनिहाय जनगणना करावी अशी मागणी त्यांनी केली.
ते म्हणाले की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आमचा विरोध नाही.त्यांना वेगळ आरक्षण द्या अशी आमची मागणी आहे.आता ओबीसी समाजासाठी ज्या योजना आहेत.त्या मराठा समाजाला लागू करण्यात येत आहे.या योजना केवळ मराठा समाजाला नाही तर इतर समाजालाही द्या असे सांगितले.ओबीसी समाजासाठी योजना आखताना निधी किती लागेल याचा विचार करून मग त्या मंजूर केल्या जात आहे.
यावेळी माजी मंत्री आ.महादेव जानकर,आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, मुस्लिम ओबीसी संघटनेचे शब्बीर अन्सारी,प्रा.लक्ष्मण हाके, सत्संग मुंडे, प्रा.पी टी चव्हाण,पांडुरंग अभंग, कल्याण दळे,शंकरराव लिंगे,दौलतराव शितोळे, डॉ.सुदर्शन घेरडे ,डॉ.स्नेहा सोनकाटे,जे.डी.तांडेल, आंधळे महाराज, मिननाथ पांडे, अरुण खरमाटे,अभय आगरकर, अनिल निकम, डॉ. नागेश गवळी, विशाल वालकर, भगवान फुलसुंदर,अंबादास गारुडकर यांच्यासह ओबीसी भटके विमुक्त समाजातील बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.