लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात या तारखे पासून ४ दिवस ड्राय डे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या या सूचना
अहमदनगर (दि.५ एप्रिल):-अहमदनगर व शिर्डी लोकसभा मतदार संघाच्या सार्वत्रिक निवडणूक प्रक्रियेत कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे.
मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व मतमोजणी ४ जूनचा संपूर्ण दिवस कोरडा दिवसाचा (ड्राय डे) आदेश लागू राहणार आहे. अहमदनगर जिल्हा व जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या इतर जिल्ह्यातील ५ किलोमीटर क्षेत्रासाठी कोरडा दिवस अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश आहेत.लोकप्रतिनिधीत्व अधिनियम १९५१ च्या कलम १३५ (सी) अन्वये व मुंबई दारूबंदी कायदा, १९४९ चे कलम १४२ च्या अधिकाराचा वापर करून जिल्हाधिकाऱ्यांनी कोरडा दिवसाचा आदेश जारी केला आहे.दिंडोरी (नाशिक), नाशिक,भिवंडी (ठाणे) या लोकसभा मतदार संघातील मतदानाचा दिवस २० मे २०२४ आहे. बारामती (पुणे), उस्मानाबाद, माढा (सोलापूर) या लोकसभा मतदार संघातील मतदानाचा दिवस ७ मे असल्यामुळे या मतदार संघाच्या सीमेलगत अहमदनगर जिल्ह्यातील ५ किलोमीटर अंतरावर कोरडा दिवस लागू असल्याचा आदेशही अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी काढला आहे.
या आदेशानुसार अहमदनगर जिल्हा व जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या ५ किलोमीटर अंतरावर सर्व प्रकाराच्या मद्य विक्रीची दुकाने (अनुज्ञप्त्या) बंद राहतील.अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेला लागून असलेल्या जालना, औरंगाबाद, शिरूर (पुणे), बीड या लोकसभा मतदार संघाचा निवडणूकीचा मतदानाचा दिवस १३ मे २०२४ असल्याने त्यादिवशी कोरडा दिवस ठेवण्याचा आदेश त्या लोकसभा मतदार संघातील जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी वेगळा आदेश जारी केलेला नाही. सर्व दारू विक्रेत्यांनी आपले दुकानातील (अनुज्ञप्त्या) देश व विदेशी,इतर अनुज्ञप्त्या असलेल्या दारूची विक्री मतदान संपण्याच्या ४८ तास आधीपासून म्हणजे ११ मे ते १३ मे या कालावधीत व मतमोजणी ४ जूनचा संपूर्ण दिवस बंद ठेवावी. असे ही आदेशात नमूद आहे.
या कार्यक्षेत्रातील राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक,दुय्यम निरीक्षक, भरारी पथक क्र.१ व क्र.२ यांनी मद्याची विक्री, वाहतूक व दुकाने (अनुज्ञप्त्या) उघड्या राहणार नाहीत. याबाबत दक्षता घ्यावी. सदर आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्ती (दारू विक्री दुकान) चा दारू विक्रीचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात येईल.अशा सूचना ही जिल्हाधिकारी सिध्दाराम सालीमठ यांनी त्यांच्या आदेशात दिल्या आहेत.