येथील शेतकऱ्याच्या पोल्ट्रीफार्म मध्ये बिबट्याने चारशे कोंबड्यांचा पाडला फडशा
अकोले प्रतिनिधी (दि.९.जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यात अकोले तालुक्यातील मेहंदुरी येथील शेतकरी सुधीर दगडू बंगाळ यांच्या पोल्ट्री फार्ममध्ये तीन बिबट्यांनी घुसून चारशे कोंबड्यांचा फडशा पाडल्याची घटना शुक्रवारी दि.६ जानेवारी रोजी रात्री घडली असून दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. मेहेंदुरी परिसरात उसाची शेती मोठ्या प्रमाणात असल्याने येथे बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे.काही दिवसांपूर्वी वनविभागाने मेहेंदुरी उंचखडक शिवारातून एक तर निंब्रळ निळवंडे परिसरातून चार बिबटे जेरबंद केले तरी ही परिसरात अनेक बिबटे संचार करीत असल्याचे दिसून येत आहे.शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास बंगाळ यांच्या पोल्ट्रीत तीन बिबटे घुसले व कोंबड्यांना आपले भक्ष्य बनविले,अनेक कोंबड्या जखमी झाल्या आहेत.पहाटे चार वाजता बिबटे पोल्ट्रीत घुसल्याची लक्षात आले. त्यानंतर बिबटे जवळच्या उसात पसार झाले.शनिवारी वनपरिक्षेत्र अधिकारी प्रदीप कदम,वनपाल विठ्ठल पारधी यांनी घटनास्थळी भेट दिली. पंचनामा केला.यात शेतकऱ्याचे सुमारे अंदाजे दीड लाख रुपयाचे नुकसान झाले आहे.