दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद लाखोंचा ऐवज हस्तगत एलसीबी टीमची कारवाई
अहमदनगर (दि.२८ जुन):-श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगांव येथे दरोड्याच्या तयारीत असलेले 4 आरोपी 4 लाख 26 हजार 700/-रुपये किंमतीचे मुद्देमालासह जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे.तसेच त्यांच्याकडून घरफोडीच्या 2 गुन्ह्यांची उकल झाली आहे.
बातमीची हकीकत अशी की जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.राकेश ओला व स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि/श्री.दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेतील पथक
अहमदनगर जिल्ह्यातील दरोडा व जबरी चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींची माहिती काढत असताना पोनि/श्री.दिनेश आहेर यांना गुप्तबातमीदारा मार्फत इसम नामे गुंड्या डिस्चार्ज काळे (रा. छत्रपती संभाजीनगर) हा त्याचे 5 ते 6 साथीदारांसह 2 मोटार सायकलवर येवुन बेलापुर ते पढेगांव रोडवर काळभैरवनाथ मंदीराचे कमानीजवळ, ता.श्रीरामपूर येथे अंधारामध्ये थांबुन कोठे तरी दरोडा घालण्याचे तयारीत दबा धरुन बसलेले आहेत आता गेल्यास मिळुन येईल अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोनि/श्री.आहेर यांनी प्राप्त माहिती पथकास कळवुन खात्री करुन कारवाई करणे बाबत आवश्यक सुचना दिल्या.
पथकाने लागलीच बातमीतील ठिकाणी बेलापुर ते पढेगांव रोडवर, काळभैरवनाथ मंदीराचे कमानी समोर येथे जावुन खात्री केली असता काळभैरवनाथ मंदीराचे कमानी समोरील ओढयाचे पुलाजवळ, उंबरगांव शिवारात काही संशयीत इसम दबा धरुन बसलेले दिसले.पथक संशयीतांना पकडण्याचे तयारीत असतांना,त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते पळुन जावु लागले.पथकाने त्यांचा पाठलाग करुन 04 इसमांना शिताफीने ताब्यात घेतले.त्यावेळी तेथुन 02 इसम अंधाराचा फायदा घेवुन पळुन गेले.ताब्यात घेतलेल्या संशयीतांना अंधारामध्ये थांबण्याचे कारणाबाबत विचारपुस करता त्यांनी काहीएक समाधानकारक उत्तरे दिली नाही.त्यावेळी त्यांना त्यांची नावे गांवे विचारता त्यांनी त्यांची नावे स्वरुप ऊर्फ गुंड्या डिस्चार्ज काळे,द-या बरांड्या भोसले, आजब्या महादु भोसले सर्व रा.अंतापुर,ता. गंगापुर,जिल्हा छत्रपती संभाजीनगर व कुलत्या बंडु भोसले रा. बाबरगांव,ता.गंगापुर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे असल्याचे सांगितले.
त्यांचेकडे पळुन गेलेल्या संशयीत इसमांचे नांव पत्ते विचारले असता त्यांनी पळुन गेलेल्या इसमांची नावे रवि ऊर्फ रविंद्र मुबारक भोसले (फरार) व सोहेल पठाण (फरार) दोन्ही रा. गंगापुर,जिल्हा छत्रपती संभाजीनगर असे सांगितले.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींकडे अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कोठे गुन्हे केले याबाबत अधिक विचारपुस केली असता त्यांनी नेवासा व श्रीरामपूर शहर परिसरात गुन्हे केल्याचे सांगितल्याने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी केली असता आणखीन 2 गुन्हे उघडकीस आले.ताब्यातील इसमांची पंचा समक्ष संशयीतांची अंगझडती घेता त्यांचे कब्जात 70,000/- रुपये किंमतीची 10 ग्रॅम वजनाची बोरमाळ, 70,000/- रुपये किंमतीचे लॉकेट, 42,000/- रुपये किंमतीची 6 ग्रॅम वजनाची नथ, 35,000/- रुपये किंमतीची 5 ग्रॅम वजनाची अंगठी, 1,60,000/- रुपये किंमतीच्या 2 शाईन मोटार सायकल, 2,000/- रुपये किंमतीची 1 तलवार, 2,000/- 1 एअर पिस्टल, 500/- 1 कटावणी, 200/- 1 रामपुरी चाकु, मिरचीपुड असा एकुण 4,26,700/- रुपये किमतीचा मुद्देमाल मिळुन आल्याने त्यांचे विरुध्द एमआयडीसी पो.स्टे.गु.र.नं. 655/2024 भादविक 399,402 सह आर्म ऍ़क्ट 4/25 प्रमाणे दरोडा तयारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन करीत आहे.सदरची कारवाई श्री.राकेश ओला पोलीस अधीक्षक,श्री.वैभव कलुभर्मे अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर,डॉ. श्री.बसवराज शिवपुजे उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीरामपूर विभाग यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोउपनि/सोपान गोरे व अंमलदार मनोहर गोसावी,रविंद्र कर्डीले, दत्तात्रय हिंगडे, बापुसाहेब फोलाणे, ज्ञानेश्वर शिंदे,गणेश भिंगारदे,पंकज व्यवहारे, विशाल दळवी,विश्वास बेरड,देवेंद्र शेलार,संदीप चव्हाण,संदीप दरंदले, संतोष खैरे,फुरकान शेख,अमृत आढाव, रविंद्र घुंगासे,विशाल तनपुरे,मच्छिंद्र बर्डे, जालिंदर माने,मयुर गायकवाड,शिवाजी ढाकणे,किशोर शिरसाठ, प्रमोद जाधव,मेघराज कोल्हे,अरुण मोरे व मोहम्मद शेख यांनी केलेली आहे.