सूनिती बेकरी आणि प्रशिक्षण केंद्राचे स्नेहालय येथे उद्घाटन
अहमदनगर (दि.११ जुलै):-स्नेहालयाच्या कौशल्य विकास केंद्र प्रशिक्षण प्रकल्पाच्या अंतर्गत येथील लाभार्थी आणि स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल मधील विद्यार्थ्यांना व्यावसायिक प्रशिक्षण दिले जाते.याच प्रकल्पात आता सूनिती बेकरी आणि प्रशिक्षण केंद्राची भर पडली आहे.जेष्ठ समाजसेविका डॉ. भारती रवींद्र बर्गे यांच्या हस्ते बेकरीचे उद्घाटन करण्यात आले.
या प्रसंगी प्रभात बेकरीचे संचालक संजय शिवशंकरजी राठोड, पीएमआरडीए पूणेच्या सहआयुक्त स्नेहल बर्गे, विधी आणि संशोधन विभाग सीआयडी पुणे जिल्ह्याच्या पोलीस अधिक्षक पल्लवी बर्गे उपस्थित होत्या.तसेच स्नेहालयचे पालक सौ. स्नेहा फडके,श्रीकांत फडके,विश्वस्त राजीव गुजर,स्वयंसेवक भरत कुलकर्णी,सचिव डॉ. प्रीती भोंबे,शाळेचे संचालक राजेंद्र शुक्रे आणि हनीफ शेख, विश्वस्त राजीव सिंग,शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा मुंगी,बेकरी कोर्सचे प्रशिक्षक श्रीनिवास तडका आदी उपस्थित होते.स्नेहालय सारखे निस्पृह काम करणाऱ्या संस्थेला दिलेलं दान हे नेहेमी सत्पात्री असते.आणि सर्व प्रकल्प पाहिल्यावर संस्था योग्य मार्गाने जात असल्याचे समाधान वाटते अश्या भावना डॉ.बर्गे यांनी आपल्या भाषणात व्यक्त केल्या.
“बेकरीचे प्रशिक्षण व उत्पादन करणे ही एक कला आहे.ही कला आता आपण आपल्या विद्यार्थ्यांमध्ये रुजवणार आहोत.या प्रशिक्षणाच्या माध्यमातूनच स्नेहालयातील लाभार्थी गट हा आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी व सक्षम होईल अशी खात्री सचिव डॉ.प्रीती भोंबे यांनी दिली.स्नेहालय पालक श्रीकांत फडके यांनी आपल्या आई,म्हणजेच सुनीती आजी फडके यांचे दातृत्व आणि शिकवण अश्या अनेक आठवणींना उजाळा दिला.सुनीती बेकरीच्या रूपाने फडके आजी कायम आपल्यासोबत असतील असे समाधान त्यांनी यावेळी व्यक्त केले.स्नेहालय संस्थेचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी आपल्या आभार प्रदर्शन भाषणामध्ये संस्था सुरू झाल्यापासून स्नेहालयातील मुलांना गेली ३४ वर्ष सातत्त्याने ताजे पाव आणि बेकरीचे पदार्थ तीन पिढ्या अव्याहत पुरवत असेलल्या प्रभात बेकरीचे संचालक राठोड परिवाराचे ऋण व्यक्त केले.
फडके परिवार, राठोड परिवार,बर्गे परिवार,व उपस्थितांबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना असे अनमोल हात आणि आशीर्वाद लाभ्ल्यानेच संस्था इतक्या लोकांपर्यंत पोहोचून सेवा देत असल्याचे नमूद केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्नेहालय इंग्लिश मिडीयमच्या शिक्षिका सविता क्षीरसागर व वृषाली पाटील यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कौशल्य विकास केंद्राचे प्रकल्प प्रमुख सागर दोंदे, इंग्लिश मिडीयमच्या मुख्याध्यापिका विणा मुंगी,स्नेहालयाचे सर्व शिक्षक वृंद आदींनी विशेष परिश्रम घेतले.