‘या’ पोलीस निरीक्षकाचे तात्काळ निलंबन करण्यात यावे चर्मकार विकास संघाचे जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन
अहमदनगर (दि.१६ जुलै):-गेल्या काही दिवसांत शेअर ट्रेडींग घोटाळ्याने तसेच शेवगाव येथील वादग्रस्त पोलीस निरीक्षक दिगंबर भदाणे यांचे कार्य पद्धतीने शेवगाव पोलीस ठाणे सर्वत्र चर्चेत आहे.
येथील वकील संघाने त्यांचे विरुद्ध आंदोलनाचा इशारा देण्यास चार दिवस उलटले नाही तोच सोमवारी दि.१५ जुलै रोजी चर्मकार विकास संघाचे प्रदेश अध्यक्षांनी जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला यांचे कडे विनयभंगाचा खोटा गुन्हा दाखल करून गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना पाठीशी घालणारे शेवगावचे पोलीस निरीक्षक भदाणे यांचे तत्काळ निलंबन करावे, अशी मागणी करून आंदोलन उभारणार असल्याचा इशारा दिला आहे.
चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष संजय खामकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी यावेळी निवेदन दिले.शेअर मार्केटच्या नावाखाली फसवणूक करणाऱ्या कमलेश सिसोदिया यांच्या बरोबर आर्थिक तडजोड करून पोलीस निरीक्षक भदाणे यांनी गणेश हनवते व त्यांचा मुलगा रोहित हनवते यांच्यावर खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
विशेष म्हणजे गणेश हनवते हे अपंग असून त्यांच्या दोन्ही पायात सळ्या आहेत.मुलगा रोहित याचे डोळ्यावर नगर शहरातील कांकरिया हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.तोही घरात पडून असताना सिसोदिया याच्या घराचा मोठ्या फाटकावरून घरात कसे घुसू शकतात? केवळ आर्थिक तडजोडीतून हनवते पिता-पुत्रां विरोधात खोटा गुन्हा दाखल करण्यात आला.कमलेश सिसोदिया तसेच त्यांच्या भावांनी अनेकांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचे अमिष दाखवून फसविल्याच्या अनेक घटना आहेत. याबाबत पोलीस अधीक्षकांना अनेक गतवणूकदारानी निवेदन गेल्या काही महिन्यापासून सादर केलेले आहेत.