फ्रीजचा स्फोट होऊन घरातील नुकसान खोलीतील ७० हजार रुपये कॅश जळून खाक
श्रीरामपूर प्रतिनिधी (दि.१२ जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यात श्रीरामपूर येथील घटनेत फ्रीजच्या स्फोटात स्वयंपाक खोलीत एका प्लास्टिकच्या डब्यात ठेवलेले ७० हजार रुपये जळून खाक झाले असल्याची घटना घडली असून काकडे यांच्या घरी मुलीच्या लग्नाची तयारी सुरू आहे.त्यासाठी जमवलेले पैसे घरात ठेवले होते.असे या कुटुंबाने सांगितले.याबाबत माहिती अशी की,शहरातील बेलापूर रस्त्यावरील श्रीकृष्ण मंदिराजवळ एका घरात बुधवारी सकाळी स्फोट झाला.यानंतर घराला आग लागून त्यात आर्थिक नुकसान झाले.लोकांनी तातडीने आग आटोक्यात आणल्याने पुढील धोका टळला.ही घटना राजेंद्र एकनाथ काकडे यांच्या घरी घडली.सकाळी काकडे व त्यांचे कुटुंबीय झोपलेले होते.घरातील महिला पाणी भरण्यासाठी उठल्या व त्यानंतर थोड्याच वेळात स्वयंपाक खोलीत मोठा स्फोट झाला.घरातील सर्व भांडे अस्ताव्यस्त पडले.स्फोटामुळे छताला हादरे बसले.घराला आग लागली.आगीच्या लोळामुळे भिंत आणि घरातील सामान जळाले, मांडण्यावर लावलेले डबे या स्फोटात उडून खाली पडले. स्फोट एवढा मोठा होता की, त्याचा आवाज शेजारीही गेला.स्फोट झाल्याचे लक्षात येताच बेलापूर रस्त्याने जाणाऱ्या एका अनोळखी व्यक्तीने तातडीने काकडे यांच्या घराकडे धाव घेतली. त्याने पाणी मागवून आग आटोक्यात आणण्यास मदत केली.त्यानंतर हा वाटसरू तेथून निघून गेला,अशी माहिती घटनास्थळावरील लोकांनी दिली.