मानसिक आरोग्यावरील प्रबोधन आणि मानसग्राम उभारणीसाठी संगीत मैफलीचे आयोजन..
अहमदनगर (दि.२७ जुलै):-मानसिक आरोग्यावरील प्रबोधन आणि मानसग्राम बांधकामासाठी निधी संकलनार्थ ‘सात रंग के सपने’ या संगीत मैफलीचे आयोजन स्नेहधारा फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे.
शनिवार दि.२७ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६ वाजता सावेडी रस्त्यावरील माऊली सभागृहात ही मैफल रंगणार आहे.पुणे येथील निषाद संस्थेचे संस्थापक चंद्रशेखर महामुनी आणि सहकलाकार हा कार्यक्रम सामाजिक जाणीवेतून सादर करणार असल्याची माहिती मानसग्राम प्रकल्पाचे मानद संचालक डॉ.नीरज करंदीकर आणि स्नेहधारा फाउंडेशनचे संस्थापक भूपेंद्र रासने यांनी दिली.
ही संगीत मैफल जुन्या सुमधुर आणि कालातीत हिंदी गाण्यांचा आस्वाद देते.मानसिक आरोग्या वरील प्रबोधनासाठी मानसग्राम प्रकल्पाने घेतलेल्या शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावरील वक्तृत्व, निबंध आणि पोस्टर स्पर्धांचे पारितोषिक वितरण यावेळी करण्यात येईल. मानसग्राम हा मानसिक आरोग्यावरील बहुउद्देशीय प्रकल्प इसळक गाव (ता.जि.अहमदनगर) येथे वर्ष 2020 मध्ये सुरू करण्यात आला. श्रद्धा रिहबिलिटेशन फाउंडेशन या संस्थेचे डॉ. भरत वाटवाणी, नगरचे करंदीकर मानसोपचार रुग्णालय आणि स्नेहालय या संस्थांनी एकत्र येऊन हा प्रकल्प सुरू केला.
जागृती आणि पुनर्वसनाचे पथदर्शी कार्य
भारत आणि शेजारी देशांमधील रस्त्यांवरील सुमारे 400 बेवारस रुग्णांचे उपचार आणि त्यानंतर कौटुंबिक पुनर्वसन या प्रकल्पाने केले. भारतातील ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी मानसोपचाराची औषधे मिळत नाहीत.त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांना मानसिक आजाराची औषधे या उपक्रमाद्वारे घरपोहोच मोफत पुरविली जातात. याशिवाय डॉ.जयंत करंदीकर स्मृती मनोबल व्यसनमुक्ती केंद्र, मोफत समुपदेशन आणि मानसिक आरोग्य मार्गदर्शन, REBT – CBT – माईंड फुलनेस असे मानसिक आरोग्याच्या संदर्भातील मार्गदर्शक उपक्रम मानसग्राम द्वारे राबविले जातात .
मानसिक निरोगी गाव, या मोहिमेअंतर्गत क्लीनिकल सायकॉलॉजिस्ट सौ. दीप्ती करंदीकर आणि टीम नगर शहर आणि तालुक्यात प्रबोधन संवादाचे नियमित स्वरूपात आयोजन करतात. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानसिक आरोग्याचा मार्गदर्शक , या पुस्तकाचा सीमा उपळेकर यांनी केलेला अनुवाद मानसग्रामने 3 वर्षांपुर्वी प्रसिद्ध केला. मानसोपचार तज्ञ उपलब्ध नसतो तेथे मानसिक आजाराचे निदान आणि त्यावरील प्राथमिक उपचारांचे मार्गदर्शन याद्वारे प्रशिक्षित परिचारक – परिचारिका तसेच या क्षेत्रातील अभ्यासक यांना राज्य स्तरावर दिले गेले. मानसिक आरोग्याच्या क्षेत्रात काम करणाऱ्या डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते आणि संस्थांना मानसग्राम प्रकल्प दरवर्षी विविध पुरस्कारांनी सन्मानित करतो.
इसळक येथील स्नेह मनोयात्री केंद्रात सध्या 35 रुग्ण आहेत .प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झाल्यावर येथे 250 रुग्णांच्या निवास आणि उपचार यांची सोय होणार असल्याचे समन्वयक रमाकांत डोड्डी,संचालक प्रवीण मुत्याल, समुपदेशक वृषाली गोखले यांनी सांगितले.सात रंग के सपने या मैफलीच्या सन्मानिकांसाठी 9822259102 येथे तर मनोयात्रींना उपचारांची मदत हवी असेल तर 9011011006 येथे संपर्काचे आवाहन संयोजकांनी केले आहे.