स्वतःचे गाळे मागण्यासाठी गेलेल्या औटी यांना सोनईत धमकावले
अहमदनगर (प्रतिनिधी):-पैशाची अडचण आल्याने मध्यस्थी मार्फत सोनई (ता. नेवासा) येथील गाळे गहाण ठेवले होते.गहाण ठेवलेले गाळे ताब्यात घेण्यासाठी गेलो असता मला अशोक कुसळकर व संदीप कुसळकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली.
चौकशीसाठी गेलेल्या एलसीबीच्या पोलिसांवरही खंडणीचा खोटा आरोप केला असल्याचे अनिल मनोहर औटी (रा.सोनई ता. नेवासा,सध्या रा.तपोवन रस्ता,नगर) यांनी म्हटले आहे.औटी यांचे सोनई गावात गाळे असून ते पूर्वी तेथे सलूनचा व्यवसाय करायचे.त्यांना सन 2003 मध्ये पैशाची अडचण आल्याने त्यांनी पाराजी कोल्हे यांच्या मार्फत अशोक कुसळकर यांच्याकडे गाळे गहाण ठेवले होते.
अशोक कुसळकर व संदीप कुसळकर यांनी ते गाळे पाडले.माहिती मिळाल्यानंतर औटी हे त्यांच्याकडे गाळे का पाडले याची विचारणा करण्यासाठी गेले असता त्यांच्याकडे कुसळकर यांनी 18 लाख रूपये मागितले व दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली.यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे तक्रार अर्ज केला होता.या तक्रार अर्जाची शहानिशा करण्यासाठी एलसीबीचे पोलीस कुसळकर यांच्या कडे गेले असता त्यांच्यावरच खंडणीचा खोटा आरोप केला.
मी पोलिसांसोबत नसतानाही माझे नाव घेतले गेले.गाळ्याचा विषय दूर ठेऊन पोलिसांविरोधात कुसळकर उपोषणाला बसले आहे.ते उपोषण चूकीचे आहे.माझे गाळे मला मिळावे,नाही तर मी सोनई पोलीस ठाण्यासमोर आत्मदहन करेल,असा इशारा औटी यांनी दिला आहे.
संदीप कुसळकर गुन्हेगारी प्रवृत्तीचा असून त्याच्यासह चार ते पाच अनोळखी यांनी बंदूकीने संपून टाकीन अशी धमकी दिली असून त्यांच्या पासून माझ्या जिवीताला धोका असल्याचे औटी यांनी म्हटले आहे.