व्हिडिओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
अहमदनगर (दि.२२ ऑगस्ट):-अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातून एक नुकतीच धक्कादायक घटना समोर आली आहे.यात व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत महिलेस मारहाण करून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपी विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज भगवान अब्दुले (रा.सदाफुले वस्ती,जामखेड) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे.आरोपीची व पिडीत महिलेची मे २०२४ मध्ये ओळख झाली होती. त्यानंतर हे दोघे फोनवरून एकमेकांच्या संपर्कात होते.काही महिन्यांपूर्वी आरोपी हा पीडित महिलेला आपण लग्न करू असे म्हणत होता.मात्र महिलेचे लग्न झालेले असून ती गेल्या सहा महिन्यांपासून वडिलांच्या घरी राहत आहे.
तिचा पहिल्या पती सोबत घटस्फोट झालेला नव्हता.त्यामुळे पीडितेने आरोपी सोबत लग्नास नकार दिला.आरोपीने मात्र,लग्नाचा खूपच हट्ट धरला होता.जुलै २०२४ मध्ये आरोपीने या महिलेवर दोनवेळा अत्याचार केला.तसेच १ ऑगस्ट २०२४ रोजी महिलेस रस्त्यात अडवून आरोपीने तिला शिवीगाळ करत मारहाण करून व्हॉट्सअॅप व्हिडीओ कॉल रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी दिली.याप्रकरणी सदर महिलेच्या फिर्यादीवरून आरोपी अब्दुले याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलिस निरीक्षक महेश पाटील हे करत आहेत.