जोडमोहा गावात तिघे करायचे जादूटोणा;सामाजिक कार्यकर्त्या निशा गायकवाड यांनी स्टिंग ऑपरेशन करून केला पर्दाफाश
वणी प्रतिनिधी:-घटनेतील फिर्यादी सौ.निशा मिलिंद गायकवाड यांचा यवतमाळ जिल्ह्यातील कळंब तालुक्यात जोडमोहा येथे खाजगी मसाल्याचा व्यवसाय असून त्या उरलेल्या वेळेत नागरिकांच्या समस्या सोडवणे तसेच सामाजिक कार्य करत असतात.
जोडमोहा गावात राहणारे राजेंद्र चक्रदास म्हैसकर,रमेश दमाहे,प्रदीप चांदेकर हे तीन इसम जादूटोणा, करणी व मुठ मारतात याबाबत गावातील महिलांनी सौ.निशा गायकवाड यांना सामाजिक कार्य करत असल्यामुळे वारंवार सांगितले होते.दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या निशा गायकवाड यांनी स्टिंग ऑपरेशन करून या माणसांवर गुन्हा दाखल केला आहे.
त्यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मी माझ्या ऑफिस समोरून जात असताना मला राजेंद्र म्हैसकर यांच्या टेलरिंगच्या दुकानात रमेश दमाहे हे बसलेले दिसले.त्यांच्या जवळ पॉलिथिन मध्ये काहीतरी सामान होते.तेवढ्यात माझ्या ऑफिस समोरून रमेश दमाहे दुचाकीवरून जात असताना त्यांच्या मोटरसायकलला ती पॉलीथीन लावलेली होती.मी त्याला थांबून पॉलिथिन मध्ये काय आहे काका मला पाहू द्या असे म्हणत त्या पॉलिथिन मध्ये उचकवून पाहिले असता त्यात कोऱ्या कागदाच्या बंच मध्ये मंत्र लिहिलेले होते तसेच सात जडीबुटीच्या कागदी पुड्या,कस्तुरी सारखा दिसणारा पदार्थ होता,त्यांना विचारले असता हे काय आहे ते म्हणाले की म्हैसकर टेलर यांनी दिलेल्या कपड्याचे कात्रण आहे असे सांगितले.
परंतु मला संशय आला की सदर वस्तू या जादूटोण्याच्या असावा याच कारणामुळे गावात या तिन्ही माणसांमुळे भीती निर्माण झाली होती त्यामुळे तात्काळ मी यवतमाळ ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये येऊन त्या बाबत फिर्याद दिली असता पोलीस ठाण्यामध्ये महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष,अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध करण्याच्या व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबत अधिनियम २०१३ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.