स्नेहालयात आदर्श शिक्षक व कर्मचारी सन्मान सोहळा उत्साहात संपन्न
अहमदनगर (दि.५ सप्टेंबर):-स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक दिनाच्या निमित्ताने आयोजित स्वर्गीय इंदिरा शामकांत मोरे पुरस्कृत स्वर्गीय शोभा महादेव कुलकर्णी आदर्श शिक्षक पुरस्कार व स्वर्गीय गोपालभाई गुजर आदर्श कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.
स्नेहालयाच्या मुत्था सभागृहात झालेल्या या सन्मान सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात जिल्हास्तरावरुन पर्यवेक्षक म्हणून उमेश घेवरीकर (पद्मभूषण बाळासाहेब भारदे हायस्कूल,शेवगाव), स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूलच्या शिक्षिका सविता बेल्हेकर आणि स्नेहालयाच्या बालभवन प्रकल्पाच्या शिक्षिका रजिया दफेदार यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले.तसेच स्नेहालयाच्या जनसंपर्क विभागातील एक्झिक्युटिव्ह संगीता सानप यांना आदर्श कर्मचारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सर्व सन्मानार्थींना सन्मानपत्र,विठ्ठलाची मूर्ती आणि अनुक्रमे ₹१०,०००, ₹७,५०० व ₹५,००० रकमेचे धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे विकास कंद यांनी आपल्या प्रेरणादायी भाषणात विद्यार्थ्यांच्या संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित केले.त्यांनी डॉ.अब्दुल कलाम,डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन व साने गुरुजी यांच्या जीवनातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. “विद्यार्थी आचरणातून संवेदनशील घडतो,” असे त्यांनी सांगत स्नेहालयाच्या ३५ वर्षांच्या प्रवासातील संवेदनशील शिक्षण पद्धतीचे यश अधोरेखित केले.शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा मुंगी यांनी मान्यवरांचे स्वागत करून कार्यक्रमाचे स्वरूप स्पष्ट केले,तर शाळेचे मानद संचालक राजेंद्र शुक्रे यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली.
स्नेहालयाचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी यांनी पुरस्कारार्थींना मार्गदर्शन करत, पुरस्कार हा प्रेरणादायी असल्याचे सांगितले. स्नेहालयाच्या अध्यक्षा जयाताई जोगदंड यांनी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या,तर रोटरी क्लब अध्यक्ष नितीन थाडे यांनी नगर जिल्ह्यात क्रीडा क्षेत्रात विकासाचे आवाहन केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती रानडे यांनी केले,तर आभार प्रदर्शन राजीव गुजर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाळेच्या शिक्षक वृंदाचे विशेष योगदान राहिले.