
अहमदनगर (दि.९ सप्टेंबर):-दोन परप्रांतीय कामगारांनी निष्काळजीपणाने व बेधडकपणे ग्रँडींग मशीन एअरच्या प्रेशर पाईपने हवा मारून युवकाला जखमी केले.

एमआयडीसीतील सह्याद्री चौकातील क्लासीक व्हील कंपनीमध्ये शनिवारी ७ सप्टेंबर रोजी पहाटे पावणे सहाच्या सुमारास ही घटना घडली.या बाबतीत शनिवारी रात्री उशिरा एमआयडीसी पोलीस ठाण्यात इतरांचे जीवित किंवा व्यक्तीगत सुरक्षितता धोक्यात आणणारी कृत्य केल्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दीपक सिंग (रा.गोपालपुरा, शमशाबाद,भिमनगर, उत्तर प्रदेश),रोशन राज (रा.लतरा, भागलपुर, बिहार) अशी गुन्हा दाखल झालेल्या दोघा परप्रांतीय कामगारांची नावे आहेत.सह्याद्री चौकातील क्लासीक व्हील कंपनीत वरील तिघे काम करतात.ते शुक्रवारी रात्री ड्युटीवर होते.शनिवारी पहाटे पावणे सहाच्या सुमारास दीपक व रोशन यांनी एकावर प्रेशर पाईपने हवा मारून दुखापत केली.
त्याच्या जिवीतास धोका निर्माण होईल असे कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.जखमी इसमाने रुग्णालयात उपचार घेतल्यानंतर शनिवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.पोलिसांनी दोघा आरोपी परप्रांतीयांवर गुन्हा दाखल केला आहे.अधिक तपास पोलीस अंमलदार टेमकर करत आहेत.