संगमनेरच्या खांडगावातील सर्पमित्राचे पर्यावरण संवर्धनाचे कार्य प्रेरणादायी;सामाजिक बांधिलकी जपत संकटातील प्राण्यांना जीवनदानासाठी करतायेत अहोरात्र मेहनत
संगमनेर (तालुका प्रतिनिधी नितीनचंद्र भालेराव):-संगमनेर तालुक्यातील खांडगाव येथील वन्य जीवरक्षक दगू रुपवते गेली वीस वर्षापासून वन्यजीव रक्षणाचे कार्य करत आहे.संकटात सापडलेले,जखमी पशु-पक्षी,वन्य प्राणी यांना वाचवून त्याच्यावर औषध उपचार करतात.
विषारी बिनविषारी साप,नाग यांची माहिती देऊन शाळा,महाविद्यालय,गावागावात समाज जागृतीचा करण्याचा वसा हाती घेतला आहे.गोवंश वासरे कत्तलीसाठी जाऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून ती वासरे स्वखर्चाने खरेदी करून पांजरपोळ संस्थेत पालन पोषणासाठी दाखल केले जातात.नदीच्या पुरात वाहून आलेले मृतदेह रेस्क्यू करणे,पाण्यात बुडालेल्या व्यक्तींना वाचविणे अथवा त्यांचा शोध घेणे,नांगराचा फाळ लागून जखमी झालेल्या साप,नाग यांना टाके टाकून औषध उपचार करून निसर्गात मुक्त करतात.अशाप्रकारे सर्पमित्र वन्यजीव रक्षक दगू रुपवते सामाजिक बांधिलकी जपत संकटात सापडलेल्या प्राण्यांना जीवनदानासाठी संगमनेर तालुक्यात अहोरात्र मेहनत करत आहे.
खांडगाव येथील शेतकरी कुटुंबांत जन्मलेल्या दगू रुपवते यांचे सातवी पर्यंत शिक्षण झाले.सन २००२ मध्ये संभाजी नगर येथे राज्यस्तरीय सर्पमित्र संमेलना मध्ये सहभाग घेतला.सदर सर्पमित्र संमेलना मध्ये केरळ येथील सर्पतज्ञ यांची भेट झाली त्यांच्या मार्गदर्शनाखाली विषारी-बिनविषारी सापांची माहिती घेण्यास सुरुवात केली.त्यानंतर सलग ३ वर्षे विषारी-बिनविषारी सापांची माहिती घेऊन त्यांचा अभ्यास केला.त्यानंतर सर्प,नाग यांना जीवनदान देण्यासाठी काम करण्याचा निर्धार सर्पमित्र वन्यजीव रक्षक दगू रुपवते यांनी केला.तेव्हापासून सापांना जीवनदान देण्याचे कार्य करत आहेत.शेतात नांगराच्या फळाला अडकून गंभीर जखमी झालेले साप,नाग,घोणस,धामीन यांना घरी आणून त्यांना टाके टाकून औषध उपचार करतात.उपचारा नंतर निसर्गात मुक्त करतात याकामी त्यांची पत्नी शारदा रुपवते,मुलगी दीक्षा रुपवते यांचे मोठे सहकार्य मिळते.
ऑगस्ट २०२२ मध्ये मालपाणी लॉंन्स संगमनेर येथील ३५-४० फुट उंच अशोकाच्या झाडावर जीवाच्या आकांताने तडफडणाऱ्या कावळ्याला वाचविण्यासाठी ना शिडी,ना दोरखंड उपलब्ध परंतु दगू रुपवाते हे झाडाच्या फांद्या फांद्यानला फकडत मोठ्या धाडसाने कावळ्या पर्यंत पोहचले.नायलॉन मांज्या मध्ये अडकलेल्या जखमी कावळ्याला मोठ्या शिताफीने रेस्क्यू केले.जखमी कावळ्यावर औषध उपचार करू त्याला निसर्गात मुक्त केले.जवळे कडलक येथील विहिरीतून पाच फुट लांबीचा विषारी नाग यशस्वीरित्या रेस्क्यू केला.अडवा ओढा रायतेवाडी जवळ एका विहिरीतून मेंढपाळांचे मेंढीचे कोकरू रेस्क्यू केले.तर खंडगाव येथील बाळासाहेब भिकाजी वर्पे यांच्या खोल विहिरीमध्ये पडलेले पाळीव मांजर मोठ्या कौशल्याने बाहेर काढले.
गोवंश संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद
सन २०२३ मध्ये कसारवाडी बायपास पुलाखाली आजारी जखमा झालेली तीन महिन्यांची कालवड सोडून दिली होती.त्याबाबत माहिती मिळताच दगू रुपवते यांनी तिला घरी नेऊन औषध उपचार केले.आज ती कालवड एक वर्षाची झाली आहे. तसेच गोवंश वासरे कत्तलीसाठी जाऊ नये यासठी शेतकऱ्यांकडून ते वासरे स्वखर्चाने पाचशे रुपये देऊन खरेदी करून पांजरपोळ संस्थेत पालन पोषणासाठी दाखल करतात.प्राणीमात्रावर दया केली पाहिजे,हिंसा करू नये,निसर्गातील प्राणी साखळी टिकली पाहिजे यासाठी समाजप्रबोधन करत भगवान बुध्द,भगवान महावीर यांनी दिलेला अहिंसेचा विचार समाजात रुजविण्याचे कार्य ग्रामीण भागात करत आहे.अशाप्रकारे संगमनेर तालुक्यात दगू रुपवते यांचे गोवंश संवर्धनाचे कार्य कौतुकास्पद आहे.
धोकादायक परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जपणारे समाजमित्र
वन्यजीव रक्षक दगू रुपवते हे वन्यजीव रक्षणाबरोबर गोवंश संवर्धन,अहिंसावादी विचारांचे प्रचार-प्रसाराचे कार्य कौतुकास्पद आहे.त्याचबरोबर जीवाची पर्वा न करता सामाजिक बांधिलकी जपण्याचे कार्य करतात.नदीला पूर आल्यास त्यात वाहून आलेले मानवी मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यासाठी जाणता राजा प्रतिष्ठाण प्राणीमित्र व सर्पमित्र सेवा संघटना संगमनेरचे संस्थापक मुकेश नरवडे,तालुकाध्यक्ष दगू रुपवते सह संघटनेचे पदाधिकारी तत्काळ घटनास्थळी धाव घेतात आणि पुराच्या पाण्यात वाहून आलेले मृतदेह काढण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांना मदत करतात.प्रवरा नदी गंगामाई घाट परिसरात पोहताना बुडालेले व्यक्तींना वाचविण्यासाठी तसेच बुडालेल्या व्यक्तींना पाण्यातून बाहेर काढण्यासाठी दगू रुपवते आपल्या सहकार्यांसह अग्रेसर असतात.पोलीस विभागाच्या आर्थिक मदतीविना,संरक्षक कीट उपलब्ध नाही परंतु मोठ्या धाडसाने बुडालेल्या व्यक्तींना बाहेर काढण्याचे कार्य सामाजिक बांधिलकी जपत दगू रुपवते करतात.खांडगाव वनविभाग परिसरात डोंगरावर एका अति उंच सुबाभाळीच्या झाडावरून आत्महत्या केलेल्या पुरुषाचा मृतदेह काढण्याचे धाडस करत नव्हते.झाडावरील मृतदेहाची परिस्थिती पाहून पोलीस कर्मचाऱ्यांनी दगू रुपवते यांना घनस्थळी बोलावून घेतले.मोठ्या धाडसाने झाडाच्या फांद्या फांद्यांला धरून मृतदेहा पर्यंत पोहचले. कौशाल्यापणाला लावत सदरचा मृतदेह यशस्वीरीत्या झाडावरून खाली काढला.सन २०१७-१८ मध्ये एक मनोरुग्ण महिला खंडगावात आली असता रात्रीच्या वेळी काही जण सदर महिलेचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात होते.सदर प्रकार लक्षात आल्यानंतर गावातील महिलांच्या मदतीने त्या मनोरुग्ण महिलेला पोलिसांच्या स्वाधीन केले.तसेच सर्पदंश झालेले काही व्यक्ती अंधश्रध्देतून दैवी उपाय योजना करतात.डॉक्टरां मार्फत औषध उपचार करण्यास नकार देतात.अशा सर्पदंश झालेल्या व्यक्तींचे प्रबोधन करून त्यांना हॉस्पिटल मध्ये औषध उपचार करण्यास मार्गदर्शन व सहकार्य करतात.रस्त्यात कोणाचे पेट्रोल संपले असेल तर त्या व्यक्तीस स्वतःकडील पेट्रोल देऊन अडचणीत आसलेल्या वाटसरूस मदत करतात.कोरोना काळात गोर गरीब व्यक्तींना घरपोहाच अन्न धान्य नेऊन दिले.याकामी मुलगी दीक्षा रुपवते,चुलत भाऊ सुनील शंकर रुपवते,यांचे मोठे सहकार्य मिळाले.कोरोनाग्रस्त गरीब रुग्णाचे स्वखर्चाने अंत्यविधी केले.ज्या कोरोनाग्रस्त रुग्णांचे अंत्यविधी करण्यासाठी घरातील व्यक्ती,नातेवाईक येत नव्हते अशा रुग्णांचे अंत्यविधी मित्रांच्या मदतीने पर पाडले.
पर्यावरण संवर्धक,सर्पमित्र,वनमित्र यांना शासकीय मदतीची अपेक्षा:- सर्पमित्र कोणाच्या घरी अथवा घराच्या परिसरात साप निघाल्यास तो रेस्क्यू करून निसर्गात मुक्त करतात.समाजात अनेक सर्पमित्र सर्पांना जीवनदान देण्याचे कार्य करतात.पर्यावरणाची प्राणी साखळी टिकविण्याचे काम सर्पमित्र करतात.मात्र या सर्पमित्रांना सर्प रेस्क्यू करताना सर्पदंश झाल्यास उपचारासाठी अथवा मृत्यू झाल्यास शासनाकडून कोणतीच मदत मिळत नाही.
वन विभागाचे कर्मचारी वर्ग अनेक वेळा बिबट्या,तरस,कोल्हा,लांडगा,हरीण,सर्प इ.अनेक वन्य प्राणी रेस्क्यू करण्यासाठी प्राणी मित्र,सर्पमित्र,वनमित्र यांची मोठ्याप्रमाणात मदत घेतात. परंतु शासनाकडून कोणताच मोबदला त्यांना मिळत नाही.प्राणी मित्र,सर्पमित्र,वनमित्र यांना वन्य प्राणी रेस्क्यू करताना दुखापत,इजा झाल्यास,काही अपघात,अनुचीत प्रकार घडल्यास त्यांच्या कुटुंबियांना भरीव मदत दिली जावी.संपूर्ण राज्यात प्राणी मित्र,सर्पमित्र,वनमित्र वन्यजीव रक्षणाबरोबर निसर्ग संवर्धनाचे कार्य करतात.त्यांना विमा संरक्षण,किमान मानधन,सुरक्षा कीट,ओळखपत्र मिळावे या सारख्या मागण्या महाराष्ट्र शासनाने तत्काळ मंजूर कराव्यात हि अपेक्षा सर्पमित्र वन्यजीव रक्षक दगू रुपवते यांनी व्यक्त केली आहे.