Maharashtra247

एकेकाळी कोरडवाहू शेतीमुळे हालअपेष्टांचे जीवन मात्र..डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेत मिळालेल्या विहिरीमुळे मिळाले जगण्याचं बळ शेतकरी..!

 

अहमदनगर (दि.१ ऑक्टो):-डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राहाता तालुक्यातील चितळी येथील अर्जुन सुभाष पगारे यांच्यासाठी जगण्याचं बळ देणारी ठरली आहे.एकेकाळी कोरडवाहू शेतीमुळे हालअपेष्टांचे जीवन जगणारे अर्जुन पगारे या योजनेतून मिळालेल्या विहिरीच्या पाण्याच्या माध्यमातून एकरी १२ क्विंटल सोयाबीन व गव्हाचं उत्पन्न घेत स्वावलंबनाने जीवन जगत आहेत. 

महाराष्ट्र शासनाच्यावतीने २०१७ पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे.योजनेतून दीड लाखाच्या आत उत्पन्न असलेल्या अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना सिंचन विषयक बाबीकरिता नवीन विहीर, जुनी विहीर दुरुस्ती,शेततळे अस्तरीकरण,वीज जोडणी,सौर कृषी पंप,पंप संच,तुषार सिंचन संच, ठिबक सिंचन संच या बाबीकरिता भरीव व पॅकेज स्वरुपात अनुदान दिले जाते.या योजनेमध्ये लाभार्थी शेतकऱ्यांच्या सिंचनविषयक सर्व गरजा एकाच योजनेतून एकाच वेळी पूर्ण होतात.

राहाता तालुक्यात चितळी शिवारात अर्जुन पगारे यांची ०.७५ हेक्टर शेतजमीन आहे.हे क्षेत्र पुर्णपणे कोरडवाहू असल्याने पगारे खरीपात बाजरीसारखी कोरडवाहू पीक घेत असतं.पिकासाठी लागणारा जास्त खर्च आणि उत्पन्न कमी त्यामुळे शेती फायदेशीर नव्हती. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला मोलमजूरी करून उदरनिर्वाह करावा लागत होता. 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना योजनेत पगारे यांना २०२२ मध्ये अडीच लाख रूपयांचे अनुदान मिळाले. नविन विहीरीच्या कामास मंजूरी मिळाल्यानंतर त्यांनी विहीरीचे काम वेळेत पूर्ण केले आणि सुदैवाने विहिरीला पाणीही उपलब्ध झाले. शासनाच्या अनुसूचित जाती उपयोजनेतून त्यांच्या या विहिरीत नवीन वीज जोडणी, पंपसंच व इनवेल बोरिंगसाठी अनुदान देण्यात आले. 

वीज जोडणीसह पाण्याची सुविधा मिळाल्यामुळे श्री.पगारे यांच्या कोरडवाहू शेतीचा कायापालट झाला आहे. खरीप हंगामात त्यांच्या एक एकर क्षेत्रामध्ये उत्तम गुणवत्तेचे १२ क्विंटल सोयाबीनचे उत्पन्न मिळाले तर रब्बी हंगामात १२ क्विंटल गव्हाचे उत्पन्न मिळाले आहे.

अर्जुन पगारे शेतकरी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेमुळे मला आता शाश्वत पाण्याचा स्त्रोत उपलब्ध झाला. यामुळे माझी कोरडवाहू शेती बागायती झाली असून खात्रीशीर उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. 

जालिंदर पठारे गटविकास अधिकारी

राहाता तालुक्यात-चितळी या गावात शासनाची डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना राबविण्यात येत आहे. या योजनेतून अर्जुन पगारे यांना २ लाख ९३ हजार रूपयांचे अनुदान विहीरसह देण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या जीवनमानात कायापालट झाला. शासन व पंचायत समितीच्या माध्यमातून अशा कल्याणकारी योजना राबविण्याचा प्रयत्न आहे.

You cannot copy content of this page