माजी महापौर संदीप कोतकर व त्यांच्या समर्थकांवर कोतवाली गुन्हा दाखल
अहिल्यानगर (दि.२५ प्रतिनिधी):-केडगाव येथील शिवसैनिकांच्या दुहेरी हत्याकांडामधील आरोपींकडून पुन्हा एकदा खून झालेल्या शिवसैनिकांच्या घरापुढे जाऊन दहशत करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे.खून प्रकरणात आरोपी असलेले माजी महापौर संदीप कोतकर व त्यांच्या समर्थकांनी हा प्रकार केला असून यासंदर्भात तब्बल दोनशे जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी संग्राम संजय कोतकर यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.विधानसभा निवडणूक लढवण्याच्या दृष्टीने आणि कुटुंबातील एक सदस्य विधानसभेला उभा राहणार असल्याचे कारण देत संदीप कोतकर यांनी आपल्यावर लागू असलेली जिल्हा बंदी उठवावी या यासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.
या अर्जावर गुरुवारी सुनावणी होती.मात्र जिल्हाबंदी उठवण्याच्या आधीच संदीप कोतकर यांच्या कार्यकर्त्यांनी संदीप कोतकर यांचे जल्लोषात स्वागत करत मोठे शक्ती प्रदर्शन केले.ज्या खून प्रकरणात माजी महापौर संदीप कोतकर आरोपी आहेत त्या खून झालेल्या शिवसैनिकांच्या घरासमोर फटाक्यांची आतिषबाजी करत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या संदर्भात संग्राम कोतकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात माजी महापौर संदीप कोतकर,सचिन भानुदास कोतकर यांच्यासह तब्बल 200 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.