ज्या किल्ल्यांवर इतिहास घडला ते किल्ले जपणे गरजेचे – जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे;स्नेहबंध फाउंडेशनतर्फे जिल्हास्तरीय किल्ले बनवा स्पर्धेचे पारितोषिक वितरण
अहिल्यानगर प्रतिनिधी:-गड-किल्ले हेच महाराष्ट्राचे खरे वैभव आहे. त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे.पुढच्या पिढीला इतिहास सांगायचा असेल,तर इतिहास ज्या किल्ल्यांवर घडला ते किल्ले जपणे गरजेचे आहे.असे प्रतिपादन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले.
स्नेहबंध फाउंडेशनच्या वतीने दिवाळी निमित्त घेण्यात आलेल्या किल्ले बनवा स्पर्धेतील विजेत्यांना जिल्हा कृषि सभागृहात पारितोषिक वितरण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी स्नेहबंध चे संस्थापक अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे, शिल्पकार बालाजी वल्लाल, सचिन पेंडूरकर, निशांत पानसरे आदी उपस्थित होते.
या स्पर्धेत पहिला क्रमांक धर्मवीर संभाजीराजे प्रतिष्ठान, द्वितीय श्री सप्तशृंगी माता मंडळ, तृतीय मुंजोबा बाल मंडळ, उत्तेजनार्थ शिवराय मित्र मंडळ, निरज यादव, ओजश्री भंडारी यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
स्नेहबंध चे अध्यक्ष डॉ. उद्धव शिंदे म्हणाले, मुलांच्या मनात असलेले गडकिल्ले ते प्रत्यक्षात साकारण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे त्यांच्या प्रयोगशीलतेला आणि कल्पकतेला वाव मिळतो. या किल्ले बनवा स्पर्धेतून महाराष्ट्राचा मराठमोळ्या इतिहास संस्कृतीची आठवण ताजी झाली.