अहिल्यानगर (प्रतिनिधी):-एमआयडीसीतील एका कंपनीवर बुलडोझर चालवून गेट व सिक्युरिटी कॅबीन तोडून ताबा मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार नुकताच समोर आला आहे.
या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.येथील व्यावसायिक अर्चना संजय पुगालिया (रा.अरिहंत शांतीविहार सोसायटी,सारसनगर, अहिल्यानगर) यांनी फिर्याद दिली आहे. प्रकाश मलय्या शेरेगर (रा.११० बी तेजपाल इस्टेट,अंधेरी कुर्ला साकीनाका, मुंबई) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे.
यातील फिर्यादी यांच्या मालकीची नागापूर एमआयडीसीतील प्लॉट बी ९० व बी ५२ येथे कंपनी आहे. प्रकाश मलय्या शेरेगर व त्याच्या साथीदारांनी फिर्यादी यांचा कायदेशीर ताबा असलेल्या प्लॉटवर कोणतीही परवानगी न घेता बेकायदेशीरपणे बुलडोझर चालविला. त्याच्या सहाय्याने कंपनीच्या गेटचे व सेक्युरीटी कॅबीन तोडून नुकसान केले.फिर्यादी व कंपनीतील कामगारांना शिवीगाळ,दमदाटी करून मारहाण केली. प्लॉटचा ताबा घेण्याकरीता धमकी दिली असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.