अकोले प्रतिनिधी (दि.२३ जानेवारी):-अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोतूळ येथील रस्ते वादातून कोतूळ येथील माजी सरपंच व कुटुंबीयांनी तीन ज्येष्ठ नागरिकांवर जीवघेणा हल्ला केला,यात पोलिस उपनिरीक्षक बाजीराव गवारी व पोलिस पाटील सतीश देशमुख हेही जखमी झाले आहेत.या गावात प्रचंड तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने गाव बंद ठेऊन निषेध व्यक्त करण्यात आला आहे. येथील रस्ता हा गोडे कुटुंबाच्या शेताशेजारून जात होता.मात्र,काही वर्षांपासून गोडे यांनी या रस्त्यावर शेती करून तो बंद केला.या विरोधात फिर्यादी सुरेश देशमुख व बाळासाहेब आरोटे,तसेच अन्य लोकांनी तहसील,प्रांत,जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्तांकडे रीतसर पुरावे दिले.तिन्ही ठिकाणी गोडे यांचे विरोधात निकाल गेला.एक महिन्यांपूर्वी या रस्त्याचे कडेला पाहुण्यांची कार उभी होती तिचा गोडे कुटुंबाच्या सदस्यांनी अक्षरशः दगडांनी भुगा केला.या घटनेनंतर चार दिवसांत पोलिस व महसूल विभागाने हा रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.काही दिवसांनी गोडे कुटुंबीयांनी या ठिकाणी घर बांधायला सुरुवात केली याची संबंधितांनी तक्रार केली असता,पोलिसांनी तातडीने रविवारी २२ जानेवारी रोजी पोलिस उपनिरीक्षक बाजीराव गवारी व पोलिस पाटील सतीश देशमुख यांनी घटनास्थळी पंचनामा करण्यासाठी पंचनामा सुरू असताना अचानक गोडे कुटुंबीयांनी गज,खोरे,दगड व धारदार शस्त्राने हल्ला चढविला.यात सुरेश वामन देशमुख,देविदास वामन देशमुख,बाळासाहेब पांडुरंग आरोटे हे ज्येष्ठ नागरिक जबर जखमी झाले.तसेच पोलिस उपनिरीक्षक बाजीराव गवारी व पोलिस पाटील सतीश देशमुख हे जखमी झाले आहेत.गवारी यांनी शासकीय रुग्णालयात उपचार घेतले,तर इतर जखमी लोणी येथे उपचार घेत आहेत.घटनेनंतर काही तासांतच गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले.गोडे कुटुंबावर आजपर्यंत अनेक हाणामारी आणि सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल आहेत.त्यामुळे योग्य कारवाई व्हावी,म्हणून गाव बंद ठेवून निषेध सभा घेण्यात आली.सायंकाळी उशिरा अकोले पोलिसांत फिर्याद दाखल करण्यात आली आहे.
