राहुरी (दि.२२ प्रतिनिधी):-राहुरी तालुक्यातील टाकळीमिया येथील रमाई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने सावित्रीच्या लेकी गुणगौरव पुरस्कार सोहळा २ फेब्रुवारी रोजी आयोजित केला असल्याची माहिती रमाई बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्यच्या संस्थापिका अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या स्नेहलताई सांगळे यांनी दिली.
या सोहळ्यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवर व राहुरी तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा राहुरी शहरातील स्नेहपुंज लॉन्स येथे ता. २ फेब्रुवारी २०२५ रोजी संपन्न होणार आहे. या सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्याचे जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री आ.शिवाजीराव कर्डिले, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडीच्या नेत्या सीमाताई आठवले, संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे आ. अमोल खताळ,नेवासा विधानसभा मतदारसंघाचे आ. विठ्ठलराव लंघे,पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या आ.मोनिकाताई राजळे यांची प्रमुख उपस्थित राहणार आहे.
तर प्रमुख मान्यवर म्हणून राहुरीचे तहसीलदार नामदेव पाटील,राहुरी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे, नायब तहसीलदार संध्याताई दळवी असणार आहेत.पुरस्कारमूर्ती म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीबद्दल राज्यस्तरीय पुरस्कार तसेच सावित्रीच्या लेकी म्हणून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जाणार असल्याची माहिती रमाई बहुउद्देशीय संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा स्नेहलताई सांगळे यांनी दिली.