ठाणे प्रतिनिधी:-जीवनधारा शक्ती संघाच्या वतीने ठाणे महापालिके समोर दि.२७ जानेवारी पासून अध्यक्षा प्रियाताई कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये संघाच्या वतीने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दिवा प्रभाग समितीचे सह आयुक्त भालचंद्र घुगे व मुंब्रा प्रभाग समितीचे सह आयुक्त बाळू पिचड व प्रभाग समितीचे अधिकारी व कर्मचारी यांच्या कृपाशीर्वादाने होत असलेल्या अनाधिकृत बांधकामामुळे अनेक निरपराध नागरिकांनी प्राण गमावले आहे.
तसेच भविष्यात कधीही भरून न निघणारे नुकसान येत्या काळात होण्याची दाट शक्यता निर्माण होत आहे.आमची जीवनधारा शक्ती संघ नावाची सामाजिक संस्था असून या संस्थेच्या माध्यमातून आम्ही समाज उपयोगी कामे तसेच अनधिकृतपणे चालणारे गैर कायदेशीर उद्योगधंदे व अन्यायकारक घटना यांच्या विरोधात आम्ही ठामपणे उभे राहून लोकांना न्याय मिळवून देत आलो आहोत. सध्या आपल्या कार्यक्षेत्रात दिवा,मुंब्रा,शीळ,डायघर, भारत गिअर कंपनी येथे आपल्या विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादाने अनेक अनाधिकृत कामे चालू आहेत. याकडे स्थानिक पोलीस देखील लक्ष देत नाही. सदर विभागात प्रदूषण तर वाढतच आहे परंतु अनेक गरीब नागरिकांकडून बुकिंग साठी पैसे घेऊन त्यांना फसविले जात आहे. येथील बिल्डर लोकांची दादागिरी वाढली असून कमी वेळेत कमी पैसा जास्तीत जास्त अनधिकृत बांधकामे करून बेकायदेशीर संपत्ती मिळाल्यामुळे ते करोडपती झालेले आहे सदर बांधकामासाठी ते कमी दर्जाचे सामान जसे लोखंडी गज वीट सिमेंट इत्यादी वापरून जनतेची फसवणूक करीत आहेत.
येथील टोलेजंग इमारतीचा पाया देखील कच्चा असल्याचे आढळून आले आहे.तरी दिवा प्रभाग समितीचे सहआयुक्त भालचंद्र घुगे व मुंब्रा प्रभाग समितीचे बाळू पिचड यांना यांच्यावर कारवाई करून त्यांना सेवेतून बडतर्फ करावे अन्यथा आमरण उपोषण तीव्र करण्यात येईल असा इशारा जीवनधारा शक्ती संघाच्या संस्थापिका अध्यक्षा प्रियाताई कुलकर्णी यांनी दिला आहे.