अहमदनगर प्रतिनिधी (दि.२६ जानेवारी):-गेल्या काही दिवसांपासून नगर शहरासह जिल्ह्यातील अनेक ठिकाणी दोन समाजात तेढ निर्माण होईल असे कृत्य काही समाजकंटकांकडून केले जात आहे.यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे.दरम्यान जिल्हा पोलिसांनी त्यादृष्टीने कठोर भूमिका घेण्यास सुरूवात केली आहे.त्याचाच एक भाग म्हणून दोन पेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.आतापर्यंत जिल्ह्यातील 459 गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.मकर संक्रांतीच्या दिवशी नगर शहरातील मंगलगेट परिसरातील जे.जे.गल्लीत दोन गटांमध्ये वाद होऊन दगडफेकीची घटना घडली.यानंतर नगर कॉलेजमध्ये किरकोळ कारणातून दोन गट पुन्हा समोरासमोर आले होते.राहुरी तालुक्यातील गुहा येथेही दोन समाजाचे गटात वाद झाले होते.अशा एक ना अनेक छोट्या-मोठ्या घटना जिल्ह्यात सुरू आहे.काही समाजकंटकांकडून जाणीवपूर्वक वातावरण दुषित करण्याचा प्रयत्न केला जात आहे.यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,अप्पर पोलीस अधीक्षक,प्रशांत खैरे,अप्पर पोलीस अधीक्षक (श्रीरामपूर) स्वाती भोर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘टू-प्लस’ चा आधार घेऊन शहरासह जिल्ह्यातील गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जात आहे.सीआरपीसी 107 नुसार 24, सीआरपीसी 109 नुसार 5 तर सीआरपीसी 110 नुसार 166 व्यक्तीकडून प्रतिज्ञापत्र लिहून घेतले आहेत. त्यांच्याकडून एखादा गुन्हा घडल्यास त्या गुन्ह्याचे स्वरूप पाहून पुढील कठोर कारवाई अशा व्यक्तींवर केली जाणार आहे.
