निलंबित DYSP असल्याचे खोटे नाटक..! दोन पोलिस शिपायांना ४० लाखांना गंडा अहिल्यानगर मध्ये धक्कादायक प्रकार..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्वतःला निलंबित डीवायएसपी असल्याचे भासवून आणि प्लॉटिंग व्यवसायाच्या नावाखाली तब्बल ४० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार अहिल्यानगरमध्ये उघडकीस आला आहे.या प्रकरणी रेल्वे सुरक्षा दलातील दोन पोलीस शिपायांनी कोतवाली पोलिसांत धाव घेतली असून,श्याम अजिनाथ साळुंखे व आकाश साळुंखे या दोघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.फिर्यादी गजानन सखाराम बोडखे आणि त्यांचे सहकारी विशाल प्रभाकर पायघन हे दोघेही अहिल्यानगर येथील रेल्वे सुरक्षा दलात पोलीस शिपाई आहेत.

त्यांची ओळख आरोपी श्याम साळुंखेशी झाली. साळुंखेने स्वतःची निलंबित डीवायएसपी म्हणून ओळख करून देत, सध्या प्लॉटिंगचा मोठा व्यवसाय करत असल्याचे भासवले.त्याने दोघांना गुंतवणुकीसाठी गोड बोलून आमिष दाखवले. “भोर गावाबाहेर मेडिकल कॉलेज होणार आहे. त्या परिसरातील दोन उत्तम प्लॉट्स प्रत्येकी २० लाख गुंठा या भावाने मिळतील,” अशा आश्वासनावर दोन्ही शिपायांनी विश्वास ठेवला.दोन्ही शिपायांनी मोठ्या कर्जाची तरतूद करून बँक ऑफ इंडिया, लातूर शाखेतील आरोपीच्या खात्यावर टप्प्याटप्प्याने ४० लाख रुपये आरटीजीएसद्वारे पाठवले. पैसे मिळाल्यानंतर प्लॉटची कागदपत्रे देणे तर दूरच, पण साळुंखेने उडवाउडवीची उत्तरे देत वेळकाढूपणा सुरू केला.दीर्घकाळ पाठपुरावा करूनही प्लॉट मिळाला नाही तेव्हा दोघांना आपली फसवणूक झाल्याची खात्री पटली.फसवणूक लक्षात येताच आरोपी साळुंखेने काही दिवसांनी ७ लाख रुपये परत केले, मात्र उर्वरित ३३ लाख रुपये देण्यास सातत्याने टाळाटाळ केली.
यानंतर बोडखे यांनी कोतवाली पोलिसांत फिर्याद दाखल केली.या गुन्ह्यात श्याम अजिनाथ साळुंखे आणि त्याचा भाऊ आकाश साळुंखे सहभागी असल्याचे समोर आले आहे. कोतवाली पोलिसांनी दोघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.अहिल्यानगरमध्ये पोलिस कर्मचाऱ्यांचीच फसवणूक होण्याची घटना समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे.शहरात या प्रकरणाची मोठी चर्चा असून आरोपींवर कडक कारवाईची मागणी होत आहे.
