अपंग महिलेशी एसटी कंडक्टरची आरेरावी..सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत संतप्त..!जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर कारवाई करण्याची मागणी
जुन्नर (प्रतिनिधी):-सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून त्यात एका अपंग महिलेशी एसटी कंडक्टरने गैरवर्तन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.याप्रकरणी सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत यांनी संताप व्यक्त करत प्रशासनाला कठोर कारवाईची मागणी केली आहे.व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसते की एक अपंग महिला एसटी बसमध्ये प्रवास करत असताना कंडक्टर तिच्याशी उर्मट आणि अरेरावीच्या स्वरात बोलताना दिसतो. महिलेला शारीरिक अडचणी असल्याचे स्पष्ट दिसत असूनही तिच्याशी आदराने संवाद न साधता कंडक्टरने तणावग्रस्त वातावरण तयार केल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.
ही घटना समोर आल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या संध्याताई भगत यांनी तात्काळ हस्तक्षेप करत एसटी प्रशासनास जाब विचारला. “अपंग व्यक्तींचा प्रवास हा केवळ सोयींचा नाही तर त्यांच्या मानवी हक्कांचा प्रश्न आहे.अशा प्रकारचे वर्तन मानवतेलाच काळिमा फासणारे आहे. संबंधिताविरुद्ध कडक कारवाई झालीच पाहिजे,” अशी तीव्र प्रतिक्रिया संध्याताई भगत यांनी दिली.संध्याताई यांनी पुढे सांगितले की, “दिव्यांग प्रवासी आधीच शारीरिक समस्यांना तोंड देत असतात.त्यांच्याशी गैरवर्तन करणे हा गुन्हाच आहे.एसटी विभागाने तात्काळ चौकशी करून जबाबदार कर्मचाऱ्यावर निलंबनासह कठोर अनुशासनात्मक कारवाई करावी.” या घटनेनंतर अनेक नागरिकांनीही एसटी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली आहे.दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी आणि संवेदनशील वर्तनाची गरज असल्याचेही मत व्यक्त केले जात आहे.या व्हिडिओमुळे दिव्यांगांच्या सुरक्षेची व सन्मानाची चर्चा पुन्हा एकदा पेटली असून,परिवहन विभागाने याकडे गांभीर्याने पाहणे अत्यावश्यक असल्याचे सामाजिक क्षेत्रातील जाणकारांनी सांगितले आहे.या घटनेबाबत पुढील चौकशी सुरू असून, संबंधित अधिकाऱ्यांकडून लवकरच अहवाल अपेक्षित आहे.
