अहिल्यानगरची विकासदौड सुरु..! सुशोभीकरण मोहीम झंझावाती वेगात..शहराचा चेहरा मोहरा बदलणारच..आमदार संग्राम जगताप यांचे व्हिजन ठरतेय गेमचेंजर
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहराचे रूप आता झपाट्याने बदलत असून शहराला आधुनिक, स्वच्छ आणि आकर्षक बनवण्यासाठी हाती घेतलेली सुशोभीकरणाची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. शहरातील प्रमुख रस्त्यांचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर आता दुभाजकांची रंगरंगोटी, स्वच्छता आणि सुशोभीकरण कार्याला गती मिळाली आहे.शहराचे लोकप्रिय आमदार संग्राम जगताप यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही कामे नियोजनबद्ध पद्धतीने पार पडत असून शहराचा चेहरामोहरा दिवसेंदिवस उजळत आहे.महानगरपालिकेमार्फत राबविण्यात येणाऱ्या रस्ते सफाई, दुभाजकांवरील रंगकाम आणि स्वच्छता उपक्रमामुळे मुख्य रस्त्यांना आकर्षक रूप प्राप्त होत आहे.
यावेळी आमदार जगताप म्हणाले की,शहराच्या पायाभूत सुविधांना बळकटी देतानाच सौंदर्य वाढवण्यावरही लक्ष केंद्रीत असून,नागरिकांना अधिक चांगले आणि आनंददायी वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे.दरम्यान,शहर सजवण्यासाठी मोठ्या मेहनतीने करण्यात येत असलेल्या या कामांचे जतन करण्याचे आवाहनही त्यांनी नागरिकांना केले आहे. नव्याने रंगवलेल्या दुभाजकांवर थुंकणे किंवा कचरा टाकून शहर विद्रूप करणाऱ्यांविरोधात नाराजी व्यक्त करत त्यांनी कचरा नेहमी घंटागाडीतच टाकण्याचे आवाहन केले आहे.“आपलं शहर… आपली जबाबदारी! स्वच्छ व सुंदर अहिल्यानगरासाठी प्रत्येक नागरिकाने सहकार्य करणे अत्यावश्यक आहे,” असे आवाहन करून शहर स्वच्छतेसाठी एकत्र येण्याची विनंती करण्यात आली आहे.अहिल्यानगरला ‘स्वच्छ, सुंदर आणि आधुनिक’ बनविण्याचा संकल्प आता प्रत्यक्षात उतरताना दिसत असून, नागरिकांच्या सहभागामुळे ही मोहीम आणखी परिणामकारक होणार आहे.
