प्रभाग ७ ला मिळणार विकासाचा नवा ध्यास..सामाजिक कार्यकर्ते संजय ठोंबरे यांची नगरसेवकपदासाठी दमदार दावेदारी..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ७ मध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलू लागली आहेत.जनतेच्या सेवेचा सातत्याने ध्यास घेणारे, अनुसूचित जमाती समाजातील लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते संजय जगन्नाथ ठोंबरे यांनी नगरसेवकपदासाठी आपली दमदार तयारी सुरू केली आहे. परिसरातील प्रश्न,नागरिकांच्या अडचणी आणि विकासाची गरज यांचा वेध घेत ठोंबरे यांनी मागील काही वर्षांत हक्कांसाठी लढा देत समाजमनात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे.

जनतेचा विश्वास-सेवाभावाची शिडी
संजय ठोंबरे हे प्रभाग ७ मधील प्रत्येक घटकांपर्यंत थेट पोहोचून काम करणारे कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. नागरिकांच्या पाणीटंचाई,ड्रेनेज समस्या,रस्ते दुरुस्ती,सार्वजनिक सोयी-सुविधांच्या उभारणीसाठी त्यांनी सतत पाठपुरावा केला आहे.कमी बोलणे आणि जास्त काम करणे ही त्यांची कार्यपद्धती असल्याने अनेक युवक,महिला, ज्येष्ठ नागरिक त्यांच्या भोवती एकवटताना दिसत आहेत.

अनुसूचित जमाती समाजाचा संघर्ष ठोंबरे हे अग्रस्थानी
अनुसूचित जमाती समाजाच्या प्रश्नांवर त्यांनी दिलेला लढा विशेष उल्लेखनीय आहे.शैक्षणिक सुविधा,शिष्यवृत्ती, घरकुल योजना, रोजगाराच्या संधी, सरकारी योजनांचा लाभ प्रत्यक्षात पोहोचवण्यामध्ये ठोंबरे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेकांना शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष फायदा मिळाला आहे.
प्रभागाच्या विकासासाठी ‘मिशन 2025’
प्रभाग ७ च्या सर्वांगीण विकासासाठी ‘मिशन 2025’ हा ठोस आराखडा संजय ठोंबरे यांनी तयार केला असून यात स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचा बदललेला चेहरा,जलपुरवठा समस्येचे कायमस्वरूपी समाधान,रस्ते,गटारी,पथदिवे यांची आधुनिक उभारणी,महिला सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम,युवकांसाठी खेळ व करिअर मार्गदर्शन केंद्र,ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य सुविधा असे महत्त्वाचे मुद्दे प्राधान्याने समाविष्ट आहेत.
जनतेचा आवाज ठोंबरे यांच्याकडून अपेक्षा मोठ्या
प्रभागातील नागरिक संजय ठोंबरे यांना सेवाभावी, प्रामाणिक आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून पाहत आहेत. त्यांच्या संपर्कक्षमता आणि तत्परतेमुळे मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. “प्रभाग ७ ला तळागाळातील माणसांना समजणारा नगरसेवक हवा आणि हे गुण संजय ठोंबरे यांच्यात आहेत,” अशा प्रतिक्रिया नागरिकांकडून उमटत आहेत.संजय ठोंबरे यांच्या प्रवेशाने प्रभाग ७ मधील निवडणूक चुरशीची होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असून ‘जनतेच्या सेवेसाठी आणि हितासाठी सदैव प्रयत्नशील नेतृत्व’ अशी त्यांची प्रतिमा अधिक मजबूत होत आहे.
