नगर (प्रतिनिधी):-एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांच्या नावाविषयी सुरू असलेल्या बदनामीची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. तर एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत त्यांचे चांगले काम सुरु असताना जाणीवपूर्वक त्यांची बदनामी केली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.तर त्यांच्या चांगल्या कामाची दखल घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
एमआयडीसी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी पदभार घेतल्यापासून एमआयडीसी हद्दीतील गुन्हेगारी रोखण्यासाठी व चोऱ्यांना अटकाव आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहे. एमआयडीसीत वाढलेली गुन्हेगारीचा बिमोड करुन त्यांनी कामगारांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण करण्याचे काम केले आहे.परप्रांतीय कामगारांना रात्री कामावरून घरी येताना काही गुंड लोकांकडून मारहाण करून मोबाईल व पैसे हिसकावून घेण्याचे प्रकार वाढले होते.चौधरी यांनी या घटनेची दखल घेऊन कामगारांना लुटणाऱ्या गुन्हेगारांना अटकाव करुन कामगारांमध्ये सुरक्षित वातावरण निर्माण केले. एमआयडीसी मधील भुरट्या चोऱ्यांना आळा बसला आहे.तर कंपन्यांमध्ये होणाऱ्या चोऱ्या देखील काही प्रमाणात थांबले असल्याचा दावा राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष ढवळे यांनी केला आहे.
एमआयडीसी हद्दीत असलेल्या गावांमध्ये होणारे सार्वजनिक उत्सव,यात्रा मधील भांडणे थांबविण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यश आले आहे.त्यांनी विविध कंपन्यातील युनियन कामगार व मालक यांच्यामधील मध्यस्थीने वाद मिटवून चांगले वातावरण निर्माण केले आहे.एमआयडीसीत गुन्हेगारी थांबवून चोऱ्या, मारामाऱ्याच्या आदी प्रवृत्तीला अटकाव करणारे सहाय्यक पोलीस निरीक्षक चौधरी यांची जाणीवपूर्वक बदनामी सुरु असून, बदनामी करणाऱ्यांची वरिष्ठ पातळीवरून खातेनिहाय चौकशी करण्याची मागणी ढवळे यांनी केली आहे.